आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प, कृषी राधाकृष्ण विखे पाटील यांची घोषणा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - या वर्षी हळदीला कमी भाव मिळाल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे शेती उत्पादनाला स्थैर्य देण्यासाठी पुढील वर्षापासून सर्वच शेतमालाची हमी भावाने खरेदी करण्यात येणार असून राज्याच्या शेतीचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणार आहोत, अशी घोषणा राज्याचे कृषी व पणनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी येथे केली.
कृषी विभाग हिंगोली, राष्टÑीय फलोत्पादन अभियान व महाराष्टÑ स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प यांच्या वतीने येथील तापडिया इस्टेट मैदानावर आयोजित राज्यस्तरीय बळीराजा कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवाचे उद्घाटन विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात सध्या शेतमालाची परवड होत असल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. त्यामुळे शेती उत्पादनाबरोबरच त्यावर प्रक्रिया
उद्योग उभारण्यासाठी राज्य शासन शेतक-यांना मदत करणार आहे.
आतापर्यंत फक्त तूर, सोयाबीन, गहू, हरभरा आदी मालाला हमी भाव देण्यात येत होता, परंतु यापुढे सर्वच शेतमालाची हमी भावाने खरेदी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कृषी विद्यापीठाने अधिकाधिक संशोधन करून कोरडवाहू शेतक-यांसाठी बियाणे तयार करण्याची गरज आहे. सध्या बियाणे व खतांचा काळाबाजार होत असून राज्यामध्ये शेतक-यांची लूट चालू आहे. बियाणे व खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी यापुढे कायद्यात दुरुस्ती करून बियाणे व खताचा काळाबाजार करणा-यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक-यांनीही समूह व गट तयार करून पोलिस कारवाईची भीती न बाळगता बियाणे व खताचा काळाबाजार करणा-यांचा बंदोबस्त करावा. यासाठी जिल्हाधिका-यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्यातील सिंचन क्षमता वाढवण्यासाठी सर्व दुष्काळी तालुक्यांतील शेतक-यांना ठिबक व तुषार सिंचनाचे अनुदान वाढवून 90 टक्के जाहीर केले. यासंदर्भात एका महिन्याच्या आत निविदा काढून ठिबक, तुषार सिंचन तयार करणा-या कंपनीला निर्धारित किमतीत विक्री करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
जिल्ह्याला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता : गतवर्षीच्या कृषी प्रदर्शनात जिल्ह्यातील शेतक-यांना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी कोल्ड स्टोरेज सेंटर, केळी उत्पादकांसाठी रायपनिंग सेंटर व कृषी महाविद्यालय सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. याची आठवण करीत त्यांनी कळमनुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कोल्ड स्टोरेज सेंटर, औंढा तालुक्यातील गोळेगाव येथे कृषी महाविद्यालय व केळी उत्पादकांसाठी रायपनिंगला मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
कृषी विद्यापीठांनी चार भिंती सोडाव्यात
राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांनी अंतर्गत कृषी महाविद्यालय, संशोधन संस्थांनी शेतक-यांत जाऊन तंत्रज्ञानाची माहिती शेतावरच उपलब्ध करून देण्यासाठी गावे दत्तक घेण्याची सूचनाही त्यांनी केली. कृषी विद्यापीठांनी चार भिंतीच्या आत न राहता व कृÞषी विभागाच्या कर्मचा-यांनी कार्यालयातच न बसता बाहेर पडून प्रत्यक्ष शेतावर जाऊन कारभार पाहण्याचे आदेशही त्यांनी दिले. यासाठी राज्याच्या कृषी विभागाने कृषी अधिका-यांना 60 हजार लॅपटॉपचे वाटप केले आहे. त्यामुळे सर्व कृषी अधिका-यांनी शेतक-यांच्या बांधावर जाऊन समस्या सोडवाव्यात.
कोरडवाहू शेती अभियान
राज्यातील 82 टक्के शेती कोरडवाहू आहे. सध्या धरणे बांधण्यासाठी शेतकरी जमिनी देत नाहीत. या प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे वेळेत पुनर्वसन होत नाही. त्यामुळे सध्या धरणे बांधण्याचे दिवस संपले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरडवाहू शेतक-यांच्या हितासाठी कोरडवाहू शेती अभियान (ड्रायलँड फार्मिंग मिशन) राबवण्यात येणार आहे.
नवे तंत्रज्ञान अंगीकारण्यास उत्सुक
शेतकरी नवीन तंत्रज्ञान अंगीकारण्यास उत्सुक असून तो कृषी विद्यापीठ व कृषी विभागाकडे आशेने पाहत आहे. अशा कृषी प्रदर्शनातून नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्याची शेतक-यांची मानसिकता वाढत आहे. हिंगोलीसारख्या मागास जिल्ह्यात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाची सुरुवात करणा-या माजी खासदार शिवाजी माने यांचे त्यांनी अभिनंदन केले.