आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाल्यांचे गुण, खोड्याही कळणार मोबाइलवर !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या पाल्याची महाविद्यालयातील उपस्थिती, चाचणीसह परीक्षेतील गुण, अभ्यासातील प्रगती, केलेल्या चुका आता पालकांना घरबसल्या एसएमएसद्वारे कळणार आहेत. शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. हे महाविद्यालय कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे असून संस्थेचे अध्यक्ष राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आहेत.
घराबाहेर पडून मोकाट फिरणा-या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी स्वतंत्र गुणवत्ता विकास कक्ष (क्वालिटी डेव्हलपमेंट युनिट) सुरू करण्यात आला असून या कक्षातून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. कक्षाच्या नियंत्रणासाठी दोन प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा डेटा गुणवत्ता विकास कक्षातील खास प्रणालीमध्ये (सॉफ्टवेअर) साठवून ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेपासून जातीचा प्रवर्ग, रक्तगट, वजन, पत्ता, पालकांचा मोबाइल नंबर, ई-मेल आदींचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना स्वतंत्र कोड देण्यात आले असून या क ोडवर त्याची दैनंदिन हजेरी, तासिकांची उपस्थिती, चाचणी परीक्षेतील उपस्थिती, प्रात्यक्षिक, चाचणी आणि परीक्षेतील गुण, खेळातील प्रगती यासह वर्गात-महाविद्यालयाच्या आवारात केलेल्या खोड्यांची नोंद अपडेट करण्यात येत आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याचे गुण पाहता यावेत यासाठी कक्षातून दर महिन्याला एसएमएस पाठवण्यात येणार आहेत. प्राथमिक स्तरावर महाविद्यालयाने विज्ञान शाखेसाठी हा कक्ष सुरू केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आठ दिवसांत या शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ९5 टक्क्यांवर गेली आहे. पूर्वी उपस्थितीचे प्रमाण 50 टक्क्यांवर होते. येत्या काही महिन्यांत सर्व विभागांसाठी ही प्रणाली वापरली जाणार आहे.

घसरलेला दर्जा सुधारण्याचे महाविद्यालयासमोर आव्हान
रामकृष्ण परमहंस महाविद्यालय ही कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची शाखा आहे. या शाखेची 1९5८ ला सुरुवात झाली. महाविद्यालयाच्या स्थापनेच्या पहिल्याच वर्षी सुमन मानकोसकर या विद्यार्थिनीने विद्यापीठात प्रथम येण्याचा मान मिळवला. या महाविद्यालयात शिकलेले अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर पोहोचले. क ॉपीमुक्तीचा पहिला प्रयोग सुरू केल्याबद्दल महाविद्यालयाला विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. गेल्या काही वर्षांत मात्र गुणवत्तेत घसरण झाली. राज्यातील नामांकित असलेल्या संस्थेच्या या महाविद्यालयासमोर घसरलेला दर्जा सुधारण्याचे आव्हान आहे.

विद्यार्थी बनले प्राचार्य
1 डिसेंबर 2011 रोजी डॉ. युवराज भोसले यांनी प्राचार्यपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी महाविद्यालयाला शिस्त लावली आहे. विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करण्यात आले आहे. टवाळखोरी करणा-या टोळक्यांवर क ारवाईसाठी त्यांनी पावले उचलली आहेत. एकेकाळी याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन बाहेर पडलेले डॉ. भोसले यांचीच आता प्राचार्यपदावर नियुक्ती झाली आहे.

ऑनलाइन माहिती
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी संबंधित एखाद्या घटकाची माहिती इंटरनेटवरून पाहता यावी यासाठी महाविद्यालयाने नियंत्रण कक्षात सोय केली आहे. विद्यार्थी हवी असलेली माहिती इंटरनेटवरून मिळवू शकतात. या माहितीमुळे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल.
प्रा. एस. एस. भोसले, नियंत्रक, गुणवत्ता विकास कक्ष.

शिस्त लागेल
पाल्यांचे गुण कळल्यानंतर पालक त्याच्या शिक्षणाचा विचार करतील. पाल्याचे सर्वच गुण सांगणारी ही यंत्रणा आहे. त्यामुळे महाविद्यालयातील मुलांना चांगली शिस्त लागेल.
प्रा. एन. पी. नामदास, नियंत्रक

आठ दिवसांत उपस्थिती ९५ टक्क्यांच्या वर !
मी यापूर्वी मिरज (जि. सांगली) येथे डॉ. बापूजी साळुंखे महाविद्यालयात गुणवत्ता विकास कक्ष हा उपक्रम सुरू केला होता. या उपक्रमामुळे महाविद्यालयाची गुणवत्ता वाढली आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्ता, प्राध्यापकांचे अध्ययन हे या उपक्रमामुळे लक्षात येते. उपक्रम सुरू केल्यानंतर अवघ्या आठ दिवसांत उपस्थिती ९5 टक्क्यांच्या वर गेली. खरे परिणाम आगामी काळात दिसून येतील.
डॉ. युवराज भोसले, प्राचार्य, रामकृष्ण महाविद्यालय, उस्मानाबाद.