आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture Technique: 72 Lakh Rupees Bringol Within Six Acre

शेत शिवार: सहा एकरांत घेतली 72 लाख रुपयांची वांगी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - सहा एकर शेतीत वांग्याच्या पिकातून 72 लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथील शेतकरी दांपत्याने केली आहे. सत्यवान व पवित्राबाई सुरवसे या शेतकरी दांपत्याचे या यशाबद्दल कौतुक झाले आहे. पवित्राबाईं यांना जिजाऊ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 30 वर्षांमध्ये नवनवीन प्रयोग करून हे दांपत्य 7 एकरांवरून 95 एकरांचे मालक झाले आहे. वांगे शेतीच्या प्रयोगातून तर त्यांनी विक्रम केला आहे.
मुर्टाजवळील मानमोडी शिवारात सत्यवान यांना वडिलोपार्जित 7 एकर जमीन होती. द्राक्षबाग, भाजीपाला शेती करत त्यांनी मुरमाड शेतातला प्रगतिशील शेतकरी म्हणून लौकिक मिळवला. मानमोडीत जमीन शिल्लक नसल्याने त्यांनी मुर्टामध्ये पडीक जमीन विकत घेतली. तिची मशागत करून द्राक्षबाग उभारली. मेहनत, सचोटीच्या जोरावर 30 वर्षांत ते 95 एकरांचे मालक बनले. माळरान असलेले मुर्टा शिवार त्यांच्या मेहनतीच्या बळावर बहरून गेले आहे. शेतामध्ये 6 ट्रॅक्टर, 50 हून अधिक मजूर, 25 ठिकाणी कूपनलिका, 10 कि.मी.वरील बोरी धरणातून जलवाहिनीने पाणी आणून शेतीचे नियोजन केले जात आहे. सध्या त्यांच्याकडे 52 एकर द्राक्षबाग असून, 12 एकर डाळिंब आणि अन्य पिके आहेत.
अशी केली शेती...
वांगे पीक 4 महिन्यांचे. 10 फूटांपर्यंत वाढणा-या गॅलन एफ-1 जातीची वांगी सुरवसेंनी लावली. द्राक्षबागेच्या शेतात झाडांना लोखंडी अँगलचा आधार दिला. वांग्याचे वजन अर्धा ते सव्वा किलो भरले. दहा बाय अडीच पद्धतीने झाडांची लागवड करून ठिबकने पाणी व खताचे नियोजन केले.
एकरी 3 लाख खर्च
6 एकरांत 300 टन पीक व त्यातून 72 लाखांवर उत्पन्न मिळाले. एकरी 2.5 ते 3 लाख खर्च आला. 27 ते 45 रुपये किलो भाव मिळाला. मुंबई, हैदराबाद येथे वांगी पाठवली जात होती.
अशक्य काही नाही
मी, पत्नी आणि दोन मुले शेतात काम करतो. नावीन्याचा ध्यास असतो. गॅलन एफ-1 वांग्याने 72 लाखांचे उत्पन्न दिले. अनेकांना विश्वास बसत नाही. पण योग्य भाव मिळाल्यास कोणालाही हे शक्य होईल.’
सत्यवान सुरवसे, शेतकरी