आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agriculture University,Latest News In Divya Marathi

कृषी विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनात धुडगूस; कुलगुरूंच्या तोंडास काळे फासण्याचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व प्रकल्पग्रस्तांमधील संघर्ष शिगेला पोहोचला असून यातूनच शेंद्रा व सायाळा येथील प्रकल्पग्रस्तांनी शुक्रवारी आक्रमक भूमिका घेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. वेंकटेश्वरलू यांच्या दालनात घुसून त्यांच्या तोंडास काळे फासण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अयशस्वी ठरला. यात कुलगुरू व प्रकल्पग्रस्तांत चांगलीच झटापट झाली असून नवा मोंढा पोलिसांनी 24 प्रकल्पग्रस्तांना अटक केली आहे. या प्रकाराने विद्यापीठ परिसरात गोंधळ उडाला.
दरम्यान, विद्यापीठ प्रशासनावर प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या हल्ल्याचा विद्यापीठ अधिकारी व कर्मचा- यांनी निषेध नोंदवत लगेचच लेखणी बंद आंदोलन सुरू केले. अधिकारी व कर्मचा- यांनी या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी (दि.2) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठाने 1972 मध्ये शेंद्रा, सायाळा व बलसा या गावांतील शेतक-यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. त्यानंतर काही प्रकल्पग्रस्तांना विद्यापीठाने सेवेत सामावूनही घेतले. उर्वरित प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया राज्य शासनाच्या आदेशानुसार सुरू आहे. विद्यापीठाने संपादित केलेली जमीन अतिरिक्त ठरविली आहे. त्यामुळे अतिरिक्त जमीन शेतक-यांना परत करावी, अशी प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न कायमच आहे. राज्य शासनाकडे हे प्रकरण असून यातील काही जमिनीवर प्रकल्पग्रस्त शेतकरी वहिती करतात. यावर्षीही या जमिनीवर शेतक-यांनी खरिपाची पेरणी केली होती. परंतु विद्यापीठ प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जमिनीवरील पीक नष्ट केले. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी संतापले आहेत. मागील काही दिवसांपासून हा संघर्ष सुरूच आहे.
यातूनच प्रकल्पग्रस्त शेतकरी शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास कुलगुरू डॉ.बी. वेंकटेश्वरलू यांच्या दालनात घुसले. या वेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला असतानाही हे प्रकल्पग्रस्त शेतकरी जबरीने कुलगुरूंच्या दालनात गेले. तेथे कुलगुरू डॉ.वेंकटेश्वरलू व प्रकल्पग्रस्तांत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून काही प्रकल्पग्रस्त कुलगुरूंच्या अंगावर धावून गेल्याने सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केला. तरीही काहींनी कुलगुरूंच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केला. परंतु तो यशस्वी झाला नाही. हा प्रकार सुरू असतानाच विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिका-यांनी या प्रकाराची माहिती नवा मोंढा पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेचच विद्यापीठ गाठून 24 जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी सुरक्षा रक्षक विठ्ठल तुकाराम लोंढे यांनी नवा मोंढा पोलिस ठाण्यात विद्यापीठ प्रशासनातर्फे दिलेल्या फिर्यादीवरून 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात प्रकल्पग्रस्त शेतकरी किशोर ढगे, गणेश ढगे, बाबासाहेब खटिंग, सखाराम शिंदे, कैलास पौळ, नागोराव शिंदे, दादाराव जोंधळे, सुभाष जोंधळे, विश्वनाथ रणेर, नामदेव ढगे, लक्ष्मण ढगे, हरिभाऊ ढगे, आबासाहेब खटिंग व शिवाजी खटिंग यांचा समावेश आहे.
कर्मचा- यांचा आज मोर्चा
विद्यापीठात कुलगुरूंच्या दालनात झालेल्या प्रकाराचा विद्यापीठ अधिकारी-कर्मचा- यांनी निषेध नोंदवत लगेचच लेखणी बंद आंदोलनास सुरुवात केली. त्यात संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक तथा कुलसचिव डॉ.बी.बी.भोसले, उपकुलसचिव आर.व्ही.जुक्टे, बी.एम.गोरे, सहायक कुलसचिव व्ही.एन.नागुल्ला, विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा.दिलीप मोरे, कास्ट्राइब कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष डॉ.जी.के.लोंढे आदींसह अधिकारी-कर्मचा- यांचा समावेश होता. विद्यापीठातील इतर कार्यालये, मुख्यालयाबाहेरील मराठवाड्यातील सर्व महाविद्यालये व संशोधन केंद्रांतील सर्व अधिकारी-कर्मचा- यांनीही लेखणी बंद आंदोलन केले. शनिवारी (दि.2) सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

ती जमीन विद्यापीठाचीच
कृषी विद्यापीठाच्या नावे सातबारा व इतर कागदपत्रांवर असलेली ती जमीन विद्यापीठाचीच असून काही मंडळी जबरीने त्यावर पेरणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब लक्षात आल्यावर विद्यापीठ प्रशासनाने 26 जुलै रोजी त्यावरील पीक काढून टाकले. मुळातच, विद्यापीठाकडे कोणतीही जमीन अतिरिक्त नाही. राज्य शासनानेही तसे जाहीर केलेले आहे. मध्यवर्ती प्रक्षेत्राची जमीन विद्यापीठाला लागणारीच असल्याने ती अतिरिक्त असण्याचा प्रश्नच नाही. या जमिनीवर बीजोत्पादनाचा कार्यक्रम विद्यापीठ प्रशासनाने घेतलेला आहे.
डॉ.बी.बी.भोसले, कुलसचिव, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ