आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • AIDS Suffered Students Fighting For Home In Latur

लातूरात एड्सबाधित विद्यार्थ्यांची निवा-यासाठी धडपड !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - एड्सबाधित अनाथ मुलांसाठी चालवल्या जाणा-या सेवालय या संस्थेतील तीन मुले या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. लातूरच्या एका नामांकित महाविद्यालयात त्यांना 11 वीत प्रवेशही मिळाला. मात्र, लातुरात राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजकल्याण खात्याच्या शासकीय वसतिगृहात राहण्यासाठी नियम आड आले आहेत. एड्सबाधित मुलांसाठीचे शासनाचे धोरणच निश्चित झाले नसल्यामुळे त्यांना निवा-यासाठी धडपडावे लागत आहे.


लातूर जिल्ह्यातल्या हासेगाव येथे सेवालय नावाची संस्था एड्सबाधित अनाथ मुलांसाठी काम करते. या प्रकल्पात एचआयव्ही पॉझिटिव्ह असलेली चार ते चौदा वयोगटातील मार्चअखेरपर्यंत 33 अनाथ मुले होती. त्यामध्ये या वर्षी आणखी सात मुलांची भर पडली आहे. त्यातच या प्रकल्पात तीन वर्षांपासून राहत असलेल्या दोन मुली आणि एका मुलाने या वर्षी दहावी उत्तीर्ण केली आहे. सततचे आजारपण असलेल्या या मुलांनी त्यावर मात केली. त्यातील मुलाला 62 टक्के, तर दोन मुलींना अनुक्रमे 52 आणि 50 टक्के गुण पडले आहेत. त्यांचे आतापर्यंतचे शिक्षण सेवालयाच्या शेजारील हासेगावातल्या शाळेत झाले.


मात्र, तेथे पुढील शिक्षण उपलब्ध नाही. त्यामुळे या तीनही मुलांना 11 वीच्या प्रवेशासाठी लातूर गाठावे लागले. त्यांना एका नामांकित महाविद्यालयात कला शाखेला प्रवेशही मिळाला. त्यामुळे आनंदाचे वातावरण असतानाच आता त्यांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. लातूरपासून सेवालयाचे अंतर 15 किलोमीटरचे आहे. मात्र, रस्ता चांगला नाही आणि जाण्या-येण्यासाठी थेट वाहनाची सोय नाही. त्यामुळे 11 वीला लातूरला प्रवेश घेतल्यानंतर या मुलांना लातूरमध्येच राहणे आवश्यक आहे.


कोठे होऊ शकते व्यवस्था ?
समाजकल्याण खात्याकडून चालवल्या जाणा-या शासकीय वसतिगृहात या मुलांची सोय होऊ शकते. मात्र, तेथे केवळ अनुसूचित जाती, जमाती, भटक्या जाती-जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांची सोय होते. तेथेही टक्केवारीची अट आहे. प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मुलांची उपलब्ध जागांसाठी मेरिटनुसार यादी लावली जाते. गुण जास्त असणा-यांचा प्रवेश होतो. तेथे 50 टक्क्यांना प्रवेश मिळणे अशक्य आहे.


टक्क्यांचा प्रस्ताव प्रलंबित
गेल्या वर्षीही सेवालयातल्या एका खुल्या संवर्गातील एड्सबाधित मुलीच्या बाबतीत हाच प्रश्न निर्माण झाला होता. त्या वेळी लातूरचे समाजकल्याणचे सहायक आयुक्त संजय दाणे यांनी विशेष अधिकाराचा वापर करीत मुलीची वसतिगृहात व्यवस्था केली होती. त्यानंतर आम्ही वसतिगृहात एड्सबाधित मुलांसाठी पाच टक्के जागा राखीव ठेवण्याची मागणी केली होती.
रवी बापटले, संस्थापक, सेवालय.


आम्ही प्रयत्नात
मेरिट डावलून वसतिगृहात प्रवेश देण्याचे अधिकार पूर्वी मंत्रालयातील सचिवांना होते. गेल्या वर्षी ते जिल्हास्तरावरील कमिटीकडे आहेत. सेवालयातील एका मुलीला गेल्या वर्षी प्रवेश दिला होता. त्यांचे अर्ज आल्यास प्रवेश देण्याचा प्रयत्न करू. संजय दाणे, सहायक आयुक्त, समाजकल्याण.