आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजिंठा लेणी व्ह्यू पॉइंटच्या पायऱ्या खचल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्दापूर - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीचा ज्या ठिकाणाहून शोध लागला आहे त्या व्ह्यू पाॅइंटपर्यंत जाण्यासाठी वन विभागाकडून पायऱ्या बनवण्यात आल्या आहेत; परंतु वन विभागाने अनेक दिवसांपासून या मार्गावरील पायऱ्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र दिसत आहे.

अजिंठा लेणी बघितल्यानंतर पर्यटक वन विभागाने सप्तकुंडच्या वर बनवलेल्या छत्रीकडे पिकनिकसाठी जातात; परंतु या छत्रीकडे जाताना पायऱ्यांशिवाय दुसरा मार्ग नाही. परंतु या पायऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे इच्छा असूनही पर्यटकांना वर जाता येत नाही. या पायऱ्यांवरील काटेरी झुडपांची छाटणी झाली नसल्याने मार्गात अडथळे येत आहेत. काही ठिकाणी पायऱ्या निखळून पडल्या आहेत. अवघड ठिकाणाहून चढण्यासाठी जे कठडे बनवले होते ते कठडेसुद्धा तुटून पडले आहेत. त्यामुळे पर्यटक वर जाणेच टाळत आहेत.
लेणीचा रस्ता निखळल्याने धोका
ज्या ठिकाणाहून अजिंठा लेणीचा शोध लागला आहे त्या ठिकाणाहूनच अजिंठ्याची लेणी क्रमांक १० ही जाॅन स्मिथ यांना १८१९ मध्ये शिकार करताना दिसली होती. याची सविस्तर माहिती गाइड बुकमध्ये नोंदवली असल्याने पर्यटक व्ह्यू पॉइंट बघण्यासाठी जातात; परंतु जाण्यासाठीचा रस्ता हा निखळून पडल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.
संपर्क होऊ शकला नाही
या प्रकरणी अजिंठा वनपरिक्षेत्र अधिकारी एस. गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पायऱ्यांचे कठडेही तुटले
सप्तकुंडावरील पाइप लावून बनवण्यात आलेले संरक्षक कठडेसुद्धा जागोजागी तुटलेले बघायला मिळत आहेत. दरम्यान, पायऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी देशी-विदेशी पर्यटकांतून होत आहे.