आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजिंठा प्रकल्पातून उपसा सुरूच; पाच गावांत पाणीटंचाईची शक्यता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - दुष्काळी परिस्थितीत अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्पातील अत्यल्प जलसाठ्यातून पाण्याचा अवैध उपसा सुरूच असल्याने धरणातील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. आजमितीस धरणात केवळ ११.७६ टक्के जलसाठा असल्याने हा जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करणे गरजेचे आहे. सध्याची पाणीपातळी पाहता भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. याबाबत प्रशासनानेही गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शिवन्यासह अजिंठा, आमसरी-वाघेरा व मादणी या पाच गावांना अजिंठा धरणातून नळयोजनेद्वारे अखंडित पाणीपुरवठा सुरू आहे. आज धरणात केवळ ११.७६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. पावसाळ्यात पाण्याचा एक थेंबही धरणाच्या तळापर्यंत पोहोचला नाही. पावसाळ्यापूर्वी अवकाळी पावसावरच धरण तग धरून आहे. परिसरात भीषण दुष्काळाची चिन्हे असताना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून हा जलसाठा आरक्षित करणे गरजेचे आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने उरल्यासुरल्या आशा आता संपल्यात जमा आहेत.

पाहणी करून कारवाई
अजिंठा धरणातून पाणी उपसा थांबवण्याबाबत सूचना दिल्या आहेत. रोहित्रेही बंद करण्यात आली. धरणातून पाणी उपसा होत असल्यास पाहणी करून कारवाई केली जाईल,असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी सांगितले.

ही गावे आहेत टँकरमुक्त
शिवन्यासह अजिंठा, मादणी, वाघेरा व आमसरी या पाचही गावांना दुष्काळात या धरणाचा मोठा आधार असल्याने या गावांची नोंद टँकरमुक्त गावांत होते. माजी आमदार कै. किसनराव काळे यांच्या कारकीर्दीत शिवना-मादणी ही संयुक्त पाणीपुरवठा योजना यशस्वी झाली होती. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच शिवना येथे आधुनिक जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत आजही शुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. मात्र, तब्बल चाळीस हजारांवर लोकांची तहान भागवणार्‍या या प्रकल्पातून पाण्याचा असाच उपसा सुरू राहिल्यास भविष्यात या गावांनाही टँकरने पाणीपुरवठा करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत.

सोयगाववर पुन्हा पाणीटंचाईचे सावट
तालुक्यातील विहिरी, हातपंपांनी तळ गाठला असून, सोयगाव, आमखेडा, गलवाडा, वेताळवाडी व जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या पाच गावांना पाणीपुरवठा करणार्‍या वेताळवाडीस्थित लघु तलावात ३१.२२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. दीड महिनाभर पुरेल एवढाच जलसाठा शिल्लक असल्याने तालुक्यात तीव्र पाणीटंचाई िनर्माण होण्याची दाट शक्यता आहे. सोयगाव तालुक्यात ९ लघु तलाव आहेत. बनोटी - ५०.३७ टक्के, वरठाण - २९.९७ टक्के, हनुमंतखेडा - ११.१२ टक्के, वरखेडी- ६.८७ टक्के, देव्हारी - ३२.३३ टक्के, जंगला तांडा - ७.४१ टक्के, तिंगापूर - १८.२४ टक्के, तर गोंदेगाव तलावाची पाणीपातळी बिलो सी लेव्हल आहे. ३४० हातपंपांपैकी १९ बंद आहेत.