आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेची भूमिका दुटप्पी : अजित पवार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- दुष्काळावर शिवसेना दुतोंडीपणाचे राजकारण करीत आहे. मराठवाड्यासाठी पाणी देताना त्यांचे नगर जिल्ह्यातील खासदार आडवे येतात. तेच नेते मराठवाड्यात आले की कळवळा दाखवतात. ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सिल्लोड येथे शेतकरी व महिला बचत गटाच्या मेळाव्यात केली.

या मेळाव्यात ठगन भागवत यांनी राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड अध्यक्षस्थानी होते. पवार म्हणाले, विकासात व दुष्काळाच्या काळात राजकारण करण्याची राष्‍ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही. मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. धरणांमध्ये फक्त 12 टक्के पाणीसाठा उपलब्ध असताना पाण्याचे नियोजन सुरू आहे. परंतु शिवसेना दुष्काळाचेही राजकारण करीत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वेळी केला.

दमदाटी करू नका महाराष्‍ट्रात फिरकू देणार नाही : पिचड
सिल्लोड- आम्हाला दमदाटी करू नका, राष्‍ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनात आणले तर राज ठाकरेंना महाराष्‍ट्रात फिरकू देणार नाही. हे मनसेच्या कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी दिला. ते म्हणाले, शिव्या देऊन नौटंकी करून तमाशा होतो राजकारण नाही. राष्‍ट्रवादीला राजकारणाची नौटंकी करायची नसल्याने कार्यकर्ते संयमात आहेत. नुकतीच राज ठाकरेंनी आर.आर. पाटलांवरही टीका केली. त्यांना छोटा आर.आर. म्हणाले; परंतु याच आर.आर. पाटलांनी युती सरकारच्या काळात विधानसभेत रमेश किणी कुठे आहे. कुणी गायब केले, असा प्रश्न विचारला असता यांना पळता भुई थोडी झाली होती. विकासाच्या विचारावर सर्वांना सोबत घेऊन चालण्याची शिकवण शरद पवार यांनी दिली असल्याचेही पिचड म्हणाले.