आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंडे मागच्या दाराने पळ काढतात; अजित पवार यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव/केज - खासदार गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला कायम वेठीस धरले. काँग्रेसमध्ये जाण्याच्या त्यांच्या हालचाली होत्या. दिल्लीत काँग्रेस पदाधिकार्‍यांसोबत बैठका घेतल्या. बदनामीपोटी त्यांनी मागच्या दाराने पळ काढला. ही मुंडेंची नेहमीचीच सवय आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

माजलगाव येथील मंगलनाथ मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ सोमवारी आयोजित जाहीर सभेत पवार ते बोलत होते.

या वेळी मंचावर आमदार प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे, अशोक डक, मोहनराव सोळंके, मोहन जगताप उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले की, केंद्रात विकासाच्या अनेक योजनांतून निधी आणण्याचे काम खासदारांचे असते. त्यासाठी खासदारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र, मुंडेंनी आजवर कुठलेच काम केले नाही. आधी पुतण्याच्या नावाने, तर कधी आईच्या नावाने लोकांना भावनिक आवाहन करून विकासाच्या मुद्दय़ापासून मतदारांची दिशाभूल केली. त्यांनी राष्ट्रीय नेते होण्याऐवजी नाटकात जायला हवे होते. आजवर भाजपच्या येदियुरप्पांसारख्या मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला. मात्र, भाजपवाल्यांनी अशा मंत्र्यांवर गोमूत्र शिंपडून पुन्हा पक्षप्रवेश दिला. एनडीएने सैनिकांच्या शवपेट्यांत भ्रष्टाचार केला. त्यांना दुसर्‍यावर आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही पवार यांनी सांगितले.

हरियाणाचा गुंड कुणाच्या बंगल्यावर ?
हरियाणाचा गुंड सुनीलकुमार याला रविवारी रात्री पोलिसांनी अंबाजोगाईच्या हॉटेलात पिस्तुलासह पकडले. तो ज्या हॉटेलात पकडला त्या हॉटेलचे उद्घाटनही मुंडेंनी केलेले होते. सुनीलकुमार हा दिल्लीत कोणाच्या बंगल्यावर असतो, खासदारांनी त्याला किती वेळा फोन केला, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांनी केली.

मुंडेंनी आत्मपरीक्षण करावे
‘धनंजय, तुझ्या काकाला एखाद्या दवाखान्यात दाखव. तुला पक्षात घेतल्यापासून ते वेड्यासारखे करत आहेत,’ असा सल्लाही अजित पवार यांनी माजलगावच्या सभेत आमदार धनंजय मुंडेंना दिला. पुतण्या व आज राष्ट्रवादीत असलेले सर्व आमदार मुंडेंना का सोडून गेले, याचे मुंडेंनी आत्मपरीक्षण करावे, असेही अजित पवार म्हणाले.