आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटरहेड छापून मिरवण्यासाठी पदे दिलेली नाहीत; अजित पवार, तटकरेंची कार्यकर्त्यांना तंबी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - मराठवाड्याच्या दौऱ्यात सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुक्रवारी लातूरमध्ये स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जनतेत मिसळून काम करण्याची तंबी दिली. पक्षाची पदे लेटरहेड छापून मिरवण्यासाठी नाही तर जनतेसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी दिली आहेत. हाय-फाय राहणीमान सोडून सामान्यांसारखा पेहराव करा आणि जनतेत मिसळा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  
 
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असलेल्या तटकरे आणि पवार यांनी शुक्रवारी लातूरचा आढावा घेतला. सकाळी त्यांनी विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर एका सभागृहात आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली. तेथे अजित पवारांनी सरकारबरोबरच आपल्या पक्षाच्या स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शिस्तीचे डोस पाजले. कार्यकर्त्यांचे राहणीमान भलतेच हाय-फाय झाले आहे. आपली भाषा, देहबोली, पेहराव सामान्य लोकांसारखी ठेवा. त्यांच्या अडीअडचणीला धावून जा. सरकारने चुकीचे निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रस्त्यावर उतरून आंदोलने करा. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या आदेशांची वाट पाहत बसू नका. मात्र काही पदाधिकारी केवळ लेटरहेड छापून इकडे-तिकडे मिरवत असतात. यासाठी पदे दिलेली नाहीत याची जाणीव त्यांनी ठेवावी. अन्यथा पक्षातून चालते व्हावे, असा इशारा त्यांनी दिला.

यापुढच्या काळात पक्षासाठी काम करणाऱ्यांनाच पदे दिली जातील, इतरांना घरी बसवले जाईल, अशी तंबी अजित पवारांनी दिली. दादांनी डोळे वटारल्याचे कमी म्हणून की काय प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही कार्यकर्त्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. कारण नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत नाहीत. तालुका, जिल्हा पातळीवरच्या बैठका होत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये समन्वय नाही. या बाबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जनहिताची कामे करावीत अन्यथा चालते व्हावे, असे ते म्हणाले. दरम्यान, शिक्षक आमदार विक्रम काळेंना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

घोषणा करतात अन् निकष लावतात  
राज्यातील सत्तारूढ भाजप-सेनेचे सरकार दररोज एक नवी घोषणा करीत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेली कर्जमाफी निव्वळ फसवी आहे. एकीकडे घोषणा केली अन् दुसरीकडे भरमसाट निकष घातले. चारचाकी असलेल्या शेतकऱ्याला कर्जमाफी नाही असले बाष्कळ निकष लावण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस याचा विरोध करीत असून सरसकट कर्जमाफी व्हायला हवी यासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला. सरकारच्या इतर निर्णयांवरही त्यांनी तोंडसुख घेतले.
 
बातम्या आणखी आहेत...