आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी ३५० महिलांनी पदर खोचला, एसपींना साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतूर : दिवसभर शेतातून कष्ट करून घरी आल्यानंतर दारूच्या नशेत असलेल्या पतीचा त्रास. जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर थेट मारहाण. हे प्रकार बंद व्हावेत म्हणून गावात दारूबंदी झाली पाहिजे, अशी मागणी वालसावंगीच्या महिलांनी अनेक वेळा स्थानिक पोलिसांकडे केली.
मात्र, त्याची दाद ना दखल. अखेर मंगळवारी निश्चय करून साडेतीनशे महिलांनी ९५ किलोमीटरचा प्रवास करून जालना गाठले. दारूबंदीच्या मागणीसाठी जातो, असे सांगितले तर पती विरोध करून जाऊ देणार नाही, याची कल्पना असल्याने बचत गटाचे कारण सांगून या महिला जालन्यात आल्या व त्यांनी जिल्हाधिकारी आणि एसपींसमोर आपली कैफियत मांडली.

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी हे जवळपास १५ हजार लोकवस्तीचे गाव. गावात गेल्या काही महिन्यांपासून अवैध दारूविक्रीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे व्यसनाधीनतेचे प्रमाणही वाढत चालले आहे. हे प्रकार थांबावेत यासाठी येथील महिलांनी पारध पाेलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन दारूविक्री पूर्णपणे थांबवण्याची मागणी केली होती.
मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप या महिलांनी केला आहे. दरम्यान, तळीरामांचा त्रास वाढल्याने अखेर महिलांनी जालना येथे येऊन जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्याकडे आपली समस्या मांडण्याचा निर्धार केला.
त्यासाठी महिलांनी पदरमोड करून २० चारचाकी गाड्यांची व्यवस्था केली व मंगळवारी सकाळी सहा वाजता कडाक्याच्या थंडीत गावातून त्या जालन्याकडे निघाल्या. त्यासाठी गेल्या आठवडाभरापासूनच त्यांनी पूर्वनियोजन केले होते. दारूबंदीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असल्याचे काहींच्या पतींना समजल्यानंतर त्यांनी जालन्यात येण्यास विरोध केला.
मात्र, या महिलांनी बचत गटाच्या बैठकीचे कारण सांगून जालना गाठले. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि एसपी ज्योतिप्रियासिंह यांना निवेदन दिले. जवळपास साडेतीनशे महिलांचा यात सहभाग होता. दारू बंद झाली नाही तर मुंबईत आंदोलन करण्याची तयारी असल्याचे काही महिलांनी सांगितले.

महिलांचा दिवसभर संघर्ष : जालन्याला जाण्यासाठी या महिला सकाळी सहा वाजता गावातून निघाल्या. त्यानंतर दहा वाजेच्या सुमारास त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. या वेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात दारूबंदीच्या विरोधात घोषणाबाजी केली. चारही कार्यालयांतील अधिकाऱ्यांना भेटून निवेदन देण्यात आले.
चार ठिकाणी निवेदने
या महिलांनी दिवसभरात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, एस. पी. ज्योतिप्रियासिंह, उत्पादन शुल्क अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांना निवेदन दिले. एसपी ज्योतिप्रियासिंह दिवसभर आयजी अजित पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त व्यग्र होत्या, मात्र तरीही त्यांनी या महिलांची कैफियत ऐकून घेतली.
बंदीसाठी मतदान घ्या
गावातील देशी दारूचे दुकान बंद करायचे असेल तर ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घ्या. त्यानंतर मतदान घ्या. २५ टक्के महिलांनी दारूबंदी व्हावी यासाठी मतदान केले तर दारूचे दुकान बंद करता येईल, असा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला. तर अनधिकृत दारू दुकाने तातडीने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जोंधळे यांनी उत्पादन शुल्क विभागास दिले.

कळू दिले नाही
- यापूर्वी पारध पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेलो तेव्हा काही महिलांना त्यांच्या पतीकडून त्रास झाला. त्यामुळे मंगळवारी दारूबंदीच्या मागणीसाठी जालन्याला जातो आहोत, हे आम्ही कुणालाच कळू दिले नाही. काहींच्या घरातून विचारणा झाली असता बचत गटाच्या मीटिंगचे कारण सांगून त्यांनी घर सोडले.
लक्ष्मीबाई पवार, वालसावंगी, ता. भोकरदन.
बातम्या आणखी आहेत...