आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षापूर्वी 2 महिने चाललेले आंदोलन बंद, मागणी करणारे विरोधक सत्तेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- तीर्थक्षेत्र प्राधिकरणात समावेश असलेल्या पैठणच्या ऐतिहासिक धार्मिक शहराला येथील देशी- विदेशी दारूच्या २० ते २५ दुकानांचा घेरा बसला असून दीड वर्षापूर्वी ज्या विरोधकांनी सुमारे दोन महिने गावातून दारू दुकाने हटवण्यासाठी पुढाकार घेतला होता, आता तेच सत्तेत आले अन् दारूची दुकाने गावाबाहेर हटवण्याची मोहीम गेल्या दीड वर्षापासून बंद आहे. दीड वर्षापूर्वी सत्तेत असलेल्या विरोधकांचे व बाहेरून पाठिंबा देणाऱ्यांचे हे आंदोलन गाजले होते. पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने आता दुकाने हटणार, असे वाटत असतानाच निवडणुकांमध्ये सत्तापालट झाला. विरोधक सत्तेत आले. त्यात आता पालिकेत सर्वच सत्तेत सहभागी झाले. डॉ. आंबेडकर पुतळा, ढोलेश्वर मंदिर, ताराई महाविद्यालय, श्रीनाथ हायस्कूल या परिसरासह शाळांलगत शहरात अनेक भागांत देशीची ६ दुकाने रस्त्यालगत थाटली आहेत, तर २६ वर बिअर बारने शहराची धार्मिक ओळख बदलल्याचे चित्र आहे. दारूची दुकाने तीर्थक्षत्र प्राधिकरणाच्या व शहराच्या पाच कि.मी. अंतराबाहेर असावीत, या मागणीसाठी तत्कालीन नगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मार्च २०१३ मध्ये बेमुदत उपोषण केले होते.
तरुण दारूच्या आहारी
शहरात पावलोपावली देशी- विदेशी दारू सहज कधीही मिळत असल्याने शहरातील तरुण दारूच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. अनेक दुकाने शहरातील मुख्य रस्त्यालगत असल्याने दारूड्यांचा झिंगल्यानंतरचा रोड शो नागरिकांना पाहायला मिळतो .
पाठिंबा देणारेच गप्प : सध्या नगरपालिकेत असणाऱ्या अनेक नगरसेवकांनी दुकाने शहराबाहेर हटवली जावीत यासाठी जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, पाठिंबा देणारे यावर चकार शब्दही काढत नाहीत हे विशेष.
शाळा, महाविद्यालयालगत दुकाने
अनेक बिअर बार, दुकाने ही शाळा, महाविद्यालयालगत असून ती पूर्ण नियमबाह्य आहेत. ती तरी जिल्हाधिकारी हटवणार काय, असा सवाल उठत आहे.
मागणी कायम, शासनाची प्रक्रिया किचकट
- पैठणच्या ऐतिहासिक धार्मिक स्थळावरील दारूची दुकाने शहराबाहेर हटली पाहिजे तसा ठराव ही नगरपालिकेने घेतला. मात्र शासनाची दारू हटवण्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे दारूची दुकाने हटली नाहीत. त्यामुळे त्याची अंमलबजवणी करावी.
- दत्ता गोर्डे, नगराध्यक्ष
शहरातील देशी- विदेशी दारूची दुकाने हटवली जावीत यासाठी आंदोलन केले व सध्याही मागणी करत आहे. मात्र, प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. ही दुकाने शहराबाहेर गेली नाहीत. दारू दुकाने हटवली गेली पाहिजेत, ही मागणी करतच राहणार आहोत.
- राजू गायकवाड, माजी नगराध्यक्ष