आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची दडी, विभागातील सर्व टँकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - यंदाच्या हंगामात पावसाने लावलेल्या पहिल्याच दमदार हजेरीमुळे राज्यातील ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र मराठवाड्यासह राज्यातील काही भागात मधल्या काळात पावसाच्या उघडिपीमुळे औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यातील टँकरला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागात पाणीपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.

राज्यात मागील वर्षी कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळी परिस्थती निर्माण झाली होती. त्यामुळे अपवाद वगळता पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले होते. त्यातील मराठवाडा टँकरवाडा झाला होता. वैजापूर तालुक्यात पाण्याच्या टँकरने ११३ पर्यंतचा टप्पा गाठला होता. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पहिल्या टप्प्यात ५० तर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व टँकर बंद करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने व पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ न झाल्याने पाण्याची समस्या कायम होती. तालुक्यासह राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या सर्व बाबींचा विचार करून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यात औरंगाबाद महसुली विभागातील सर्व जिल्हे, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे विभागातील सोलापूर, अमरावती विभागातील वाशीम, बुलडाणा व यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे. याशिवाय राज्यातील अन्य उर्वरित जिल्ह्यांतील ज्या तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल त्या जिल्ह्यांतील तालुकानिहाय गावांमध्ये टंचाई जाहीर करून त्या ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

२० गावांत २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू
दरम्यान, तालुक्यातील २० गावांसाठी २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीने तहसील प्रशासनाकडे दाखल केला आहे. यात वैजापूर ग्रामीण १ व २, बाबतारा, घायगाव, माळीसागज, रोटेगाव, बल्लाळीसागज, चोरवाघलगाव, पानवी खु., कनकसागज, भगूर, हिंगोनी, जयभवानीनगर, चांडगाव, एकोडीसागज, बेलगाव, पानवी खंडाळा, बाजाठाण, नांदगाव व नागमठाण या गावांसाठी २४ टँकर सुरू करण्यात आले होते. गुरुवारी घेण्यात आलेल्या निर्णयामुळे हे टँकर अधिकृत होणार आहेत.