आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alliance Decision Taken, Stop Comedy Patangrao Kadam

आघाडीचा निर्णय झाला; गमती-जमती बंद करा - पतंगराव कदम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित लढण्यासंदर्भात आघाडीचा निर्णय झालेला असताना, काँग्रेस किंवा राष्‍ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र लढण्याची भाषा करत गमती-जमती करू नये, त्यामुळे राज्य हातून जाऊ शकते, असासल्ला देताना काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री पतंगराव कदम यांनी आघाडीच्या कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला. ते जालना येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
कदम म्हणाले की, स्वतंत्र चूल मांडण्याच्या प्रकाराचा एकदा फटका बसला होता. त्यामुळे राज्यातील सत्ता कायम ठेवायची असेल तर गमती-जमती सोडून एकत्रित लढले पाहिजे. जालना लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहील, तर हिंगोली मतदारसंघ काँग्रेसने मागितला आहे. दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची एकत्र बैठक अद्याप झाली नाही. ती बैठक झाल्यावर प्रस्ताव तयार केला जाईल. त्यानंतर तो प्रस्ताव दिल्लीत पाठवला जाईल व त्यावर निर्णय होईल. त्यामुळे यावर कोणताही निर्णय झालेला नाही; परंतु परिस्थितीनुसार एखाद्या जागेत बदल होऊ शकेल. कुणाकडे चांगला उमेदवार आहे, त्यावरही निर्णय होऊ शकेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
पश्चिम महाराष्‍ट्रात दोन पायांचे वाघ
राज्यात वाघांची संख्या 160 वरून 200 वर पोहोचली असल्याचे वनमंत्री कदम यांनी सांगितले. विदर्भात वाघ जास्त वाढले की पश्चिम महाराष्‍ट्रात? या प्रश्नावर त्यांनी विदर्भात वाघ वाढले आहेत, तर पश्चिम महाराष्‍ट्रात दोन पायांचे वाघ जास्त असल्याची कोटी केली.
महामंडळाचा निर्णय घ्या
मंत्रिमंडळातील रिक्त पदासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कदम म्हणाले, यासंदर्भात लवकर निर्णय घेतला जावा, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. लोकसभा सहा महिन्यांवर, तर विधानसभा वर्षभरावर आल्या आहेत. त्यामुळे नियुक्त्या करायच्या असतील तर लवकर करा, अन्यथा करू नका.
विधानसभा निवडणूक
विश्वजित कदम यांनी कुठून निवडणूक लढवायची याचा निर्णय राहुल गांधी घेतील. त्यामुळे आपल्याला मुलाची काळजी नाही. त्याशिवाय सांगलीसाठी काँग्रेसकडे उमेदवार असल्याने मी लोकसभा लढवण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. मात्र, आगामी विधानसभा निवडणूक आपली शेवटची निवडणूक असेल, हे सांगायलाही ते विसरले नाही.