आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ambajogai Historiacal Hattikahana Swachata Mohim

अंबाजोगाईच्या एेतिहासिक हत्तीखान्याला स्वच्छतेची झळाळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - आजचे तरुण संवेदनशील नाहीत, प्राचीन वास्तूबाबत त्यांना आपुलकी नाही, अशी ओरड एकीकडे केली जात असली तरी दुसरीकडे अंबाजोगाईत मात्र यूथ मिनिस्ट्री, निसर्ग मित्रमंडळ तरुणांनी एकत्र येत अंबाजोगाईचा एेतिहासिक वारसा असलेल्या हत्तीखान्याची दहा दिवसांत साफसफाई करून चकाकी मिळवून दिली आहे. दुर्गंधीमुळे पर्यटक त्या वास्तूकडे फिरकत नसत. मात्र, आता हत्तीखाना तरुणांच्या पुढाकारामुळे स्वच्छ झाला आहे.
अंबाजोगाई शहरातील आद्यकवी मुकुंदराज रस्त्यावर हत्तीखाना (भूचरनाथ शैव लेणी) असून शहराचे प्राचीन वैभव आहे. हत्तीखान्यात पाषाणापासून तयार करण्यात आलेले मोठमोठे हत्ती, सभामंडप, ओवऱ्या पाहण्यासारख्या आहेत. सभामंडपातील शिलालेखात परिसरातील गावांचा उल्लेख असून या शिलालेखावरून ही वास्तू शके १०६६ मधील असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे. लेखात शेवटी शापवचन आहे की, जो कोणी राजाचे म्हणणे एेकणार नाही त्यावर योगिनीचा वज्रदंड कोसळेल, असे सांगितले जाते.

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ-अजिंठ्याप्रमाणे या हत्तीखान्याला विशेष महत्त्व प्राप्त व्हावे यासाठी साहित्यिक दगडू लोमटे यांनी हत्तीखान्यातील शैव लेणीचे फोटो सोशल साइटवर अपलोड केल्यानंतर येथे पर्यटकांची गर्दी होऊ लागली. इथे आलेल्या पर्यटकांकडून अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त होत होती.
हत्तीखान्याची दशा आणि दुर्दशा पाहून यूथ मिनिस्ट्रीच्या कार्यकर्त्यांची २५ मार्च रोजी एक बैठक घेऊन हा परिसर स्वच्छ करण्याचे ठरले. त्यानुसार दररोज सकाळी साडेसहा ते साडेआठ या दोन तासांत श्रमदान करण्याचे ठरले. वीस ते पंचवीस तरुणांनी हातात झाडू घेऊन साफसफाईस सुरुवात केली. दगडासह, दारूच्या रिकाम्या बाटल्या, पाण्याच्या बाटल्यांनी हा परिसर खचाखच भरून गेला होता.
जवळपास तीन ट्रॅक्टर कचरा या ठिकाणी निघाला. मागील दहा दिवसापंासून तरुण हत्तीखाना परिसरात परिश्रम घेत असल्याची माहिती मिळताच येथील मानवलोकचे संस्थापक डॉ. द्वारकादास लोहिया राष्ट्रवादीचे नेते नंदकिशोर मुंदडा, काँग्रेसचे राजकिशोर मोदी यांनी हत्तीखाना गाठून तरुणांच्या खांद्याला खांदा लावत येथे काम केले. जिथे इच्छाशक्ती असेल, तिथे वयाचा मोठेपणाचा विषय येत नाही. या दोन्ही नेत्यांनी हत्तीखान्यातील विहिरीत उतरून संपूर्ण गाळ काढून विहीर स्वच्छ केली.

महोत्सवासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार
^यूथमिनिस्ट्रीच्यामाध्यमातून एेतिहासिक वास्तूचे जतन होत असून हत्तीखाना स्वच्छ करत तरुणांनी चांगला संदेश दिला. अंबाजोगाई महोत्सवासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत. राजकिशोर मोदी, गटनेतेनगर परिषद.

वेरूळच्या धर्तीवर अंबाजोगाईत महोत्सव
^वेरूळयेथे शासनाच्या वतीने महोत्सव घेतला जातो. याच धर्तीवर हत्तीखान्याच्या साफसफाईनंतर लोकसहभागातून महोत्सव घेण्यात येणार आहे. एेतिहासिक वास्तूचे जतन करत स्थानिक कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महोत्सव होणार आहे. -दगडू लोमटे,साहित्यिक, अंबाजोगाई

हत्तीखाना परिसरातील पुरातन विहिरीची स्वच्छता करताना नंदकिशोर मुंदडा, डॉ द्वारकादास लोहिया, दगडू लोमटे आदी.