आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित देशमुखांचे मंत्रिपद हुकले, फौजिया खान यांचे राज्यमंत्रिपद सुरक्षित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित यांचा गुरुवारी शपथविधी होईल आणि त्यांना राज्यमंत्रिपद बहाल केले जाईल, अशी शक्यता होती. मात्र, त्यांना मंत्रिपदाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. लोकसभा निवडणुकीत लातूरमधून काँग्रेस उमेदवाराचा मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळेच त्यांचे नाव ऐनवेळी मागे पडल्याची माहिती आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांना पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करावे लागणार आहे. लातूर जिल्ह्याला शिवराज पाटील, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख या नेत्यांचा आणि त्यांच्या रूपानं मिळालेल्या मंत्रिपदाचा मोठा वारसा आहे.
युतीचा काळ वगळला तर काँग्रेसच्या सत्ता काळात लातूरला कायम मंत्रिपद मिळालं. केशवराव सोनवणे यांच्या रूपानं जिल्ह्याला पहिल्यांदा सहकारमंत्रिपद मिळालं. त्यानंतर शिवराज पाटील यांच्या रूपानं केंद्रात विविध खात्याची मंत्रिपदं, निलंगेकरांच्या रूपानं पाटबंधारे खातं, एकदा मुख्यमंत्रिपद मिळालं. विलासरावांकडे तर जवळपास प्रत्येक खात्याचा भार होता. दोनदा मुख्यमंत्रिपद मिळवणार्‍या विलासरावांच्या माध्यमातून जिल्ह्याला साडेसात वर्षे राज्याचं नेतृत्व करता आलं. मधल्या काळात त्यांचं पद गेल्यानंतर त्यांचे बंधू दिलीपराव मंत्री झाले. पुढं विलासराव केंद्रातही मंत्री झाले आणि अखेरपर्यंत कार्यरत राहिले. मात्र, विलासरावांच्या पश्चात लातूरला मंत्रिपद मिळालं नाही. विलासरावांची ताकद, त्यांच्या मागे असलेला आमदारांचा मोठा गट पाहता त्यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांना सहजपणे मंत्रिपद मिळेल, असा सगळ्यांचा अंदाज होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाचा जेव्हा-जेव्हा विस्तार करायची वेळ आली तेव्हा-तेव्हा अमित देशमुखांचे नाव आघाडीवर असायचे. मात्र प्रत्येकवेळी त्यांचा ऐनवेळी पत्ता कटला. विलासराव देशमुखांचे पक्षअंतर्गत विरोधक असलेल्या गटाकडून अमित यांना मंत्रिपद मिळू नये, यासाठी फिल्डिंग लावली जात आहे. दिल्लीत अहमद पटेल यांचे विलासरावांशी चांगले संबंध होते. पण अद्याप त्यांचा अमित यांच्याशी सूर जुळलेला नाही. त्यामुळे दिल्लीत अमित देशमुखांची वकिली करणारे कुणी नसल्यामुळेच त्यांचे नाव सातत्याने मागे पडले आहे.
विलासरावांचा गट विसर्जित
विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना राज्यात त्यांचा दबदबा होता. राज्य मंत्रिमंडळातील अनेकांचे ते गॉडफादर होते. 40-50 आमदारांचा गट त्यांच्या पाठीशी होता. अत्यंत चाणाक्ष, राजकीय टायमिंगचे भान असलेला नेता म्हणून विलासरावांची ओळख होती. राजकीय उट्टे काढण्यात वाकबगार असलेल्या विलासरावांना पक्षांतर्गत विरोधक टरकून असायचे. त्यांच्या पश्चात अमित देशमुख यांनी मात्र अत्यंत सावधपणे राजकीय पावले टाकली आहेत. वेगळा गट, आपले समर्थक अशा भानगडीत ते पडले नाहीत. त्यामुळे राज्याच्या राजकारणातील विलासरावांचा गट विसर्जित झाला आहे. त्यामुळे काँग्रेसची ताकदही विखुरली आहे.
मराठवाड्यात काँग्रेस कुठे?
राज्यात लोकसभेच्या केवळ दोन जागा आल्या, त्याही मराठवाड्यातल्या नांदेड आणि हिंगोलीमधून. मात्र, मराठवाड्यात काँग्रेसचा नेता कोण, असा प्रश्न केल्यावर त्याचे उत्तर काँग्रसेच्याच कार्यकर्त्यांना देता येत नाही. अशोक चव्हाण असे उत्तर द्यायचे, तर ते आदर्शमध्ये सापडलेले. राजेंद्र दर्डा मंत्री असले, तरी औरंगाबादच्या बाहेर ते लक्ष घालत नाहीत. डी. पी. सावंत अशोक चव्हाणांच्या सावलीतून बाहेरच पडले नाहीत आणि मधुकरराव चव्हाण यांना उस्मानाबादच सांभाळणे मुश्कील. अशा परिस्थितीत अमित देशमुखांसारख्या युवा आमदाराकडे मंत्रिपद देऊन त्यांना ताकद दिल्यास नेतृत्व विकसित करता आले असते. मात्र, काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचा विचार काही वेगळाच असल्याचे वारंवार दिसले आहे.