आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Deshmukh News In Marathi, Latur, Divya Marathi

विधानसभेची रणधुमाळी: लातूरमधून देशमुखविरोधात कव्हेकरांनी दिली मुलाखत !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या मंगळवारी मुलाखती झाल्या. त्यामध्ये लातूर शहर मतदारसंघातून राज्यमंत्री अमित देशमुख यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मुलाखत दिली आहे. त्यामुळे लातूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे.

इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी अशोक चव्हाण, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव निलंगेकर, हर्षवर्धन पाटील, राजीव सातव, विलास मुत्तेमवार, रजनीताई पाटील यांच्या पॅनलने घेतल्या. प्रारंभी जिल्ह्यातील तीनही विद्यमान आमदारांनी मुलाखती दिल्या. त्यानंतर लातूर ग्रामीणसाठी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर, विक्रम गोजमगुंडे, मांजराचे उपाध्यक्ष जगदीश बावणे यांनी मुलाखती दिल्या. लातूर शहरमधून शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी आपल्याला तिकीट मिळावे, अशी मागणी केली आहे. अहमदपूरमध्ये विक्रम गोजमगुंडे, अनसूया गरड, महेश उळागड्डे यांनी तिकीट मागितले. माजी मंत्री विनायक पाटील रासपात गेल्यामुळे त्यांनी मुलाखत दिली नाही. औसामधून विद्यमान आमदार बसवराज पाटील यांच्या विरोधात केवळ महादेव गोरे नावाच्या कार्यकर्त्याने मुलाखत दिली. निलंगा मतदारसंघात चुरस होती. विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर स्वत:च मुलाखत घेणा-यांच्या पॅनलमध्ये बसून होते. त्यांचे चिरंजीव जि. प. उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी आपली दावेदारी सांगितली. प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर यांनीही मुलाखत दिली. इतर पाच जणांनी या जागेसाठी मुलाखत दिली. नागराळकर-निलंगेकर यांच्यात
रस्सीखेच पाहायला मिळाली.

विनायक पाटलांनी काँग्रेस सोडली, आज रासपात प्रवेश
अहमदपूर विधानसभेची काँग्रेसच्या वाटणीची जागा राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता दिसत असल्यामुळे माजी मंत्री विनायक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. बुधवारी अहमदपूरमध्ये होणा-या मेळाव्यात ते महादेव जानकर यांच्या रासपात प्रवेश करणार असून पक्षामार्फत विधानसभा लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. सन 1995 मध्ये ते निवडून आले होते.

नांदेड
० भोकर : अमिता चव्हाण (संभाव्य)
० नांदेड उत्तर : पालकमंत्री डी. पी. सावंत
० नांदेड दक्षिण : आमदार ओमप्रकाश पोकर्णा
० नायगाव : आमदार वसंत चव्हाण
० मुखेड : आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर
० हदगाव : आमदार माधवराव पाटील जवळगावकर, गंगाधर पाटील चाभरेकर (माजी जि.प. सभापती), जाकीर चाऊस
० देगलूर : आमदार रावसाहेब अंतापूरकर
० नायगाव, लोहा आणि किनवट हे तीन मतदारसंघ राष्‍ट्रवादीकडे आहेत.

परभणीसाठी रस्सीखेच तर जिंतुरात केवळ बोर्डीकरच
विधानसभेच्या परभणीच्या जागेसाठी काँग्रेस उमेदवारांत झुंबड उडाली असून तब्बल 26 जणांनी मंगळवारी पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्या, तर जिंतूरमध्ये आमदार रामप्रसाद बोर्डीकर हेच केवळ एकमेव इच्छुक असल्याने तेथे इतर इच्छुकांचा प्रश्नच नव्हता. जिल्ह्यातील चारपैकी परभणी व जिंतूर या दोन जागा आघाडीतून काँग्रेसकडे आहेत. आघाडीच्या सुरुवातीपासूनच वाटणीत या दोन जागा आलेल्या आहेत, तर गंगाखेड व पाथरी या दोन जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. जिंतूर विधानसभा मतदारसंघावर गेल्या 25 वर्षांपासून वर्चस्व राखणारे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीच काँग्रेस पदाधिका-याने सुरुवातीपासूनच या जागेवरून निवडणूक लढविण्याची इच्छादेखील प्रकट केलेली नाही.
* मंठा-परतूरमधील इच्छुक : अन्वर देशमुख, राजेश राठोड, गोपाळराव बोराडे, संदीप गोरे, अतिश राठोड
* जालना : विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल, शकुंतला शर्मा, संजय लाखे पाटील, प्रा. सत्संग मुंढे

हिंगोलीत बिनविरोध उमेदवारी
आघाडीत वसमतची जागा राष्ट्रवादीकडे, तर हिंगोली आणि कळमनुरी काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे वसमत येथे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी कोणीही पुढे आले नाही, तर काँग्रेसकडे असलेल्या दोन जागांपैकी हिंगोलीत सर्वानुमते विद्यमान आमदार भाऊराव पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले असून कळमनुरीत मात्र खासदार सातव यांनी पाच जणांना चॉकलेट दिले आहे. आदिवासी युवक संघटनेचे डॉ. संतोष टारफे, अ‍ॅड. बाबा नाईक, माजी सभापती संजय बोंढारे, दिलीप देसाई व जक्की कुरेशी हे इच्छुक आहेत.