आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांनी घेतली व्ही. सतीश यांची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची शनिवारची (दि. १३) २० मिनिटांची परभणी भेट पक्ष परिवारातील व्यक्तीच्या सांत्वनासाठी होती. या भेटीत त्यांनी वेलणकर कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करीत धीर दिला. हेलिपॅड ते व्ही. सतीश यांचे घर आणि तेथून थेट हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने ते रवाना झाले.
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस व्ही. सतीश (वेलणकर) यांचे बंधू अॅड. शिरीष वेलणकर यांचे ३१ जानेवारी रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यानिमित्त वेलणकर कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी भाजपची राष्ट्रीय राज्यपातळीवरील नेतेमंडळी, मंत्री यांच्यासह बिहार महाराष्ट्राच्या राज्यपालांनी गेल्या दोन आठवड्यांत दौरे केल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास हेलिकॉप्टरने कृषी विद्यापीठातील हेलिपॅडवर दाखल झाले. वसमत रोडमार्गे ते रामकृष्णनगर येथील वेलणकर यांच्या ‘स्वागत’ या निवासस्थानी दाखल झाले. त्यांच्यासमवेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, केंद्रीय सरचिटणीस श्याम जाजू हेही होते. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत शहा हे वेलणकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. या वेळी वेलणकर कुटुंबीयांव्यतिरिक्त अन्य कोणालाही आतमध्ये परवानगी नव्हती. शहा यांनी अॅड. शिरीष यांच्या निधनाची चौकशी केल्यानंतर डॉ. गिरीश वेलणकर यांनी त्याबाबतची माहिती दिली. शहा यांनी वेलणकर यांच्या कुटुंबीयांची माहिती व्ही. सतीश यांच्याकडून घेत त्यांचे सांत्वन केले. व्ही. सतीश यांच्या आईबद्दल चौकशी करताना ‘माँ कहाँ हैं’ असे उद््गार काढले. त्या घरात असल्याचे समजल्यानंतर शहा यांनी लगेचच पेंडॉलमधून घरात प्रवेश करीत स्नेहप्रभा नारायण वेलणकर यांना नमस्कार करून त्यांना धीर दिला. आम्ही आपल्या दु:खात सहभागी असल्याचे उद्गार काढले. शहा यांच्या भेटीदरम्यान माजी खासदार भास्करराव खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा (नांदेड) हेही वेलणकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते.

वसुंधरा राजेंचा दौरा रद्द
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे याही आजच व्ही. सतीश यांच्या भेटीसाठी विमानाने जयपूरहून नांदेड नांदेडहून हेलिकॉप्टरद्वारे परभणीत दाखल होणार होत्या. परंतु जयपूर येथे विमानातील तांत्रिक बिघाडाने दौरा रद्द झाला. मात्र, राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष पांडे आले होते.