आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी, शेगावच्या धर्तीवर आता तुळजापुरातही अम्युझमेंट पार्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - कुलस्वामिनी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात येणाऱ्या भाविकांना आता रेल्वे, बोटीतून फिरण्याची मौज लुटता येणार आहे. राज्यातील प्रमुख देवस्थान शिर्डी, शेगावच्या धर्तीवर करमणुकीसाठी तुळजापुरात अम्युझमेंट पार्क उभारण्यात येणार असून, पापनाश तलावाच्या सभोवती उभारण्यात येणाऱ्या पार्कमुळे शहराच्या सौंदर्यातही भर पडणार आहे. सुमारे बारा कोटींच्या या पार्कमध्ये लहान मुलांसाठी खेळणी, बगिचा, विविध शिल्पे असतील.
महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील कोट्यवधी भाविकांची कुलस्वामिनी माता श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दररोज लाखो भाविकांची गर्दी असते. या गर्दीमुळे तुळजापूरची बाजारपेठ सक्षम बनली आहे. शहरातील हॉटेल, लॉज, प्रासादिक साहित्याच्या दुकानांची उलाढाल मोठी आहे.

तुळजापूरमध्ये दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या सरासरी लाख अाहे. असे असले तरी राहण्यासाठी, तसेच विरंगुळा करण्यासाठी आवश्यक सुविधा नसल्याने भाविक देवीदर्शनानंतर तत्काळ परत फिरतात. शिर्डी, शेगावसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकांना काही दिवस करमणूक करता येईल, अशी व्यवस्था पार्कच्या माध्यमातून तेथील मंदिर प्रशासनाने केली आहे.
असाच प्रयत्न तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी अम्युझमेंट पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ही पार्क शहराच्या वैभवाप्रमाणेच व्यवसायातही भर घालणार आहे. महानगराप्रमाणे पार्क उभारण्यात आल्यास शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल. या कामाची निविदा लवकरच निघणार असून, त्यानंतर कामास सुरुवात होईल.
शहराच्या दक्षिणेला म्हणजे शासकीय विश्रामगृहाच्या समोर मंदिर प्रशासनाची पापनाश तलावाची चार एकर जागा आहे. यापैकी एकरांवर तलाव आहे. तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणामधून कोटी रुपये खर्चून उंची वाढवून तलावाला तटबंदी बांधण्यात आली आहे. या भागातील उर्वरित जागेमध्ये बगिचा लावण्यात येणार आहे. तसेच या बगिचामध्ये बोगी असलेली स्काय ट्रेन, सहा डॅश कार, तलावामध्ये सोडण्यासाठी सहा पॅडल बोटी तसेच बगिचामध्ये छोट्यांसाठी खेळणी, विविध शिल्पे बसवण्यात येणार आहेत. परिसरात फूड स्टॉल्सही असतील.

असा होईल फायदा
शहरामध्ये आलेले भाविक दर्शनानंतर तत्काळ परत जातात. त्यांना अन्य ठिकाणी करमणुकीचे साधन उपलब्ध झाल्यास शहरातील हॉटेल्सचा व्यवसाय वाढू शकतो. ऑटोरिक्षापासून फेरीवाल्यांपर्यंत विविध व्यावसायिकांचा नफा वाढू शकतो. भाविकांप्रमाणेच पर्यटकांचीही रीघ वाढू शकते.

प्राधिकरणातून खर्च
सध्याप्राधिकरणामार्फत शहरात ३१५ कोटींची विकासकामे करण्यात येत असून, या कामांमध्ये तलावाच्या परिसरात पार्कचे काम करण्यात येणार आहे. यासाठी १२ कोटी १५ लाख रुपये खर्च येणार आहे. याची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. शुल्क ठेवण्याबाबतचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही.