अजिंठा - जगप्रसिद्ध अजिंठा लेणीत माकडांच्या उच्छादामुळे क्विंटलपेक्षा अधिक वजनाचे दगड कोसळले. यात कोणतीही जीवितहानी झाली नसून पर्यटक थोडक्यात बचावले. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
प्रत्यक्षदर्शी पर्यटकांच्या माहितीवरून शनिवारी सकाळी वानरांची टोळी लेणीच्या वर जमली होती. दरम्यान, वानरांनी उच्छाद मांडल्याने सकाळी अकरा वाजता लेणी क्र. १ व चेक पोस्टच्या मध्ये दगड कोसळले. तब्बल चार-पाच दगड कोसळले. चेक पोस्टवरून चेकिंग करून नुकतेच पर्यटक गेले होते. मात्र, सुदैवाने ते बचावले. पुरातत्त्व विभागाला याची माहिती मिळताच त्यांनी तातडीने ते दगड उचलून बाजूला केले.
पावसाळ्याच्या दिवशी अजिंठा लेणीत दगड कोसळायचे. मात्र, हिवाळ्यात माकडामुळे दगड कोसळल्याने शनिवारी पर्यटकांमध्ये वानरांची दहशत पसरली होती. या वेळी पुरातत्त्व विभागाने तातडीने कोसळणारे दगड अडवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी पर्यटकांनी केली.
दरम्यान, दैव बलवत्तर म्हणून खोली नं. १ व चेक पोस्टच्या मध्ये दगड कोसळले, तेव्हा घटनास्थळी एकही पर्यटक नव्हता. परंतु या घटनेच्या काही अंतरावर त्या वेळी लेणीत पाचशे पर्यटक आत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तात्पुरता सल्ला
पर्यटकांवर दगड कोसळू नयेत म्हणून पुरातत्त्व विभागाने लेणीमधून एक मेन दोर सेंटरमधून जिथे दगड कोसळू शकतात, तेथून सावधान सूचना पत्रक लावून नेलेली आहेत. त्याचा अर्थ मेन दोरीच्या लेणीला खेटूनच पर्यटकाने चालावे; जेणेकरून दगड त्यांच्या अंगावर न पडता त्यांच्या बाजूला पडेल.
विभागाची भंबेरी
लेणीत दगड कोसळले ही माहिती संबंधित विभागाला कळताच त्यांनी दगडाचा फोटो व माहिती माध्यमांना न देण्यास तेथील कर्मचाऱ्यांना सांगितल्याने पडलेल्या दगडांचे फोटो बाहेर आले नाहीत. पुरातत्त्व विभागाने तातडीने पडलेले दगड उचलून बाजूला टाकले. मात्र जीवितहानी टळल्याने पर्यटकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, नेहमी पडणारे दगड अडवण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते.
अहवाल देऊनही गांभीर्य नाही
अजिंठा लेणीवर सत्तर ठिकाणांचे मोठे दगड धोकादायक असल्याचा अहवाल काही वर्षांपूर्वी भूभर्ग संस्थांनी दिला होता. मात्र, त्या ठिकाणांवर अजूनही ते दगड तसेच आहेत. त्यावर कोणतीच प्रक्रिया झाल्याचे दिसून येत नाही.