आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणार: अण्णा हजारे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - आज देशात शेतकऱ्यांची अवस्था वाईट बनली असून मराठा समाज हा बहुतांशी शेतकरी असल्याने त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती दयनीय झालेली आहे. लढा उभा करून जसे भूमिअधिग्रहण बिल आणले त्याच पद्धतीने मराठा आरक्षण व शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी  लढा देण्यास तयार, असून यासाठी तुम्हा सर्वांची साथ हवी, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी  केले.  
 
तेलगाव  येथील जिजामाता विद्यालयात रविवारी माजी आमदार मोहनराव सोळंके यांच्या अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी अण्णा हजारे बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थांनी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, प्राचार्य रा. रं. बोरोडे, एस.एम.देशमुख, उद्धवबापू आपेगावकर, माजी मंत्री पंडितराव दौंड, अॅड. अजित देशमुख, आदी उपस्थित होते. अण्णा हजारे म्हणाले, माणूस या दुनियात रिकाम्या हाताने येतो. जातानासुद्धा रिकाम्या हाताने जातो. हे माहीत असतानाही अनेक जण आयुष्यभर माझं-माझं करून पैशाच्या मागे धावताना दिसत आहेत. प्रत्येकाने शुद्ध चारित्र्य, आचार, विचार, निष्कलंक जीवन जगून काही गोष्टीचा त्याग केल्यास खऱ्या अर्थाने ते आयुष्य जगण्याचे समाधान मिळते. आपण इंग्रजांना पळवले तसे पुढाऱ्यांना पळवू शकत नाहीत. पूर्वी रेल्वे राज्य मार्ग व राष्ट्रीय महामार्गांसाठी दोन्ही बाजूंनी एक-एक किलोमीटर अंतरापर्यंत जमीन अधिग्रहित करण्यात येत होत्या. 
 
हा कायदा  शेतकऱ्यांवर अन्यायकारक होता. यामुळे भारतभर आंदोलन उभा करून  शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा देऊन कायदा रद्द करण्यास भाग पाडले. सध्या परिस्थितीत शेकऱ्यांची अवस्था बिकट असून सरकारही  शेतकऱ्यांच्या  प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे. दुष्काळामुळे मराठवाड्यात सर्वात जास्त  शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची अवस्था बिकट बनली आहे. आरक्षणाच्या लढ्यात विशेषतः तरुणांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन अण्णा हजारे यांनी केले.   
 
या वेळी माजी आमदार मोहनराव सोळंके म्हणाले की, आज ही अनेक जण आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहात आहेत. त्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे. प्रास्ताविक दीपक लगड यांनी तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश गटकळ यांनी केले. आभार दिलीप पारेकर यांनी मानले.  

राजकारणातील सेवाभाव दुरावला  
खरं म्हणजे राजकारण वाईट नाही, ती ही एक सेवाच आहे. परंतु आजकालच्या राजकारण्यांनी  त्याची व्याख्या बदलली आहे.‘सत्तेतून पैसा आणि  पैशातून सत्ता’ हे समीकरण केल्यामुळे राजकारणातील सेवाभाव दुरावलेला आहे. असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.  

२० विद्यार्थी शिक्षणासाठी   
माजी आ.मोहनराव सोळंके यांच्या वयाला पासष्ट वर्षे पूर्ण झाल्यामुळे तेलगाव येथे आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी तेलगाव परिसरातील गरीब कुटुंबातील २०  विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन शिक्षणाची जबाबदारी दिलीप पारेकर यांनी उचलली आहे.   
 
कारी गावातील युवकांचा सत्कार   
धारूर तालुक्यातील कारी हे  गाव  व्यसनमुक्त करण्यासाठी अनेक युवकांनी पुढाकार घेतला असून या गावातील  युवकांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या हस्ते कारी गावातील तरुणांचा सत्कार करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...