आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक्रधर स्वामी थांबलेल्या मंदिरातून दगडी शिळा चोरीस, तपासासाठी पथक पुण्याला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - तालुक्यातील लिंबागणेश येथे महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी भेट दिलेल्या महादेव मंदिरातील दगडी शिळा गुरुवारी पहाटे गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. टेम्पोतून आलेल्या लोकांनी विधिवत पूजा करून या शिळा लांबवल्या अाहेत. याप्रकरणी ग्रामस्थांनी नेकनूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांचे एक पथक पुण्याला रवाना झाले आहे.

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामींनी बीड येथील हत्तीखाना येथील श्रीकृष्ण मंदिर, पाली, पोहीचा देव, लिंबागणेश, पाटोदा, सौताडा येथे भेटी दिल्या होत्या. यातील लिंबागणेश येथे शिवारात तेराव्या शतकातील महादेवाचे पुरातन मंदिर असून या मंदिरात चक्रधर स्वामी थांबले होते. या ठिकाणी चार बाय एक आकाराच्या दगडी शिळा असून त्यावर बसून त्यांनी ध्यान केले होते. या मंदिराच्या ललाट बिंबावर गणपतीची मूर्ती असून मंदिराची रचना, शिल्प व शैली चालुक्यकालीन आहे. गुरुवारी पहाटे एका टेम्पोमधून दहा लोक गावाबाहेरील मंदिरात आले. दगडी शिळांची विधिवत पूजा करून टेम्पोमध्ये टाकून पोबारा केला. सकाळी ग्रामस्थांना हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी नेकनूर पोलिसांना माहिती दिली असून नेकनूर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
पथक जाधववाडीला
दगडी शिळा चोरीचा प्रकार कळताच ग्रामस्थांच्या माहितीवरून नेकनूर पोलिसांचे पथक पुणे जिल्ह्यातील जाधववाडी येथे रवाना झाले आहे. काही महिन्यांपूर्वी जाधववाडी येथील काही लाेकांनी ग्रामस्थांना या दगडी शिळा आम्हाला द्या, अशी मागणी केली होती. त्या बदल्यात पैसे देण्याचे अामिष दाखवले होते, परंतु ग्रामस्थांनी याला विरोध केला होता, असे डॉ. गणेश ढवळे यांनी सांगितले.

जागरूकतेची गरज
बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक प्राचीन उद्ध्वस्त मंदिरांचे अवशेष आहेत. अनेक वर्षांपासून मौल्यवान शिल्पांची पळवापळवी झालेली आहे. धर्मापुरी येथे तर चोरांनी शिल्प चोरून नेेले होते. हीच अवस्था माजलगाव तालुक्यातील केसापुरी येथे महाड तळ्याजवळच्या प्राचीन मंदिराची आहे. त्यामुळे लोकांनीच आता आपल्या संस्कृतीविषयी जागरूक राहण्याची गरज आहे, असे इतिहासाचे अभ्यासक डॉ. सतीश साळुंखे यांनी सांगितले.

जिल्ह्याचा इतिहास धोक्यात येईल
लिंबागणेश येथील मंदिरातील दगडी शिळा चोरीचा प्रकार गंभीर असून लोकांजवळ आपल्या संस्कृतीविषयी जागरूकता नाही. त्याचा फायदा अशी मंडळी घेत आहेत. चोरांची भावना तस्करीची नसावी, श्रद्धा असावी असे वाटते. परंतु अशा प्रकारामुळे जिल्ह्यातील इतिहास धोक्यात येईल आणि पुरावेही नष्ट होतील.
डॉ. सतीश साळुंखे, इतिहास अभ्यासक