आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Anywhere Standing Election Against Gopinath Munde ,Say Dhanjaya Munde

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध कोठेही निवडणूक लढवू - धनंजय मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मुंडे विरुद्ध मुंडे निवडणूक सोपी की अवघड हा विषय खासदार गोपीनाथराव यांनाच चांगला कळणारा आहे. आमदार पंकजा पालवेंना हा विषय कळणारा नाही. त्यांना राजकारण काय माहीत? केवळ सभेला जाऊन हात उंचावण्याने राजकारण कळत नसते. लढत सोपी समजत असाल तर खासदार मुंडेंविरुद्ध आपण लोकसभा, विधानसभा निवडणूक कुठेही लढवू ! या शब्दांत खासदार मुंडेंचे पुतणे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी आमदार पंकजा पालवे यांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिले.
धनंजय मुंडे दै. ‘दिव्य मराठी’ला म्हणाले की, आमदार पंकजा पालवे यांनी तोफ डागल्याचे लोक म्हणत असले तरी तो फुसका बार आहे. साधी नाथ्रा या जन्मगावची ग्रामपंचायत निवडणूक आली, तेव्हा राष्ट्रीय नेतृत्व गावात तीन दिवस तळ ठोकून होतं. घरोघरी फिरूनही नाथ्राच्या ग्रामस्थांनी त्यांना अव्हेरलं. त्यापाठोपाठ सिरसाळा पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत तीन हजार मतदान हक्काचं मानत त्यांनी विशिष्ट समाजाचा उमेदवार दिला. आम्ही (राष्ट्रवादीने) केवळ एक हजार समाज असलेला धनगर समाजाचा उमेदवार दिला आणि जनतेने तो विजयी करत आमच्यावरचं प्रेम आणि विश्वास व्यक्त केला.
एवढ्या सगळ्या राजकारणानंतरही त्यांना निवडणूक सोपी वाटत असेल तर खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याविरुद्ध लोकसभा, विधानसभा निवडणूक कोठेही लढवण्यास आपण घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देत घोडा आणि मैदान फार दूर नाही, असे आव्हानही त्यांनी दिले.
पुण्यात काय बोलल्या होत्या पंकजा पालवे !
बीडमध्ये आगामी निवडणूक मुंडे विरुद्ध मुंडे अशी झाली तर आमच्यासाठी ती आजवरची सर्वात सोपी निवडणूक ठरेल. कारण बीडच्या जनतेचे आजही गोपीनाथ मुंडे यांच्यावर पूर्वीइतकेच प्रेम आणि विश्वास आहे.
रणशिंग फुंकू द्या... दाखवून देऊ
निवडणूक आखाडा जवळ येऊ द्या. आम्हीदेखील कोणाचा किती आत्मविश्वास आहे, हे दाखवून देऊ. रणशिंग फुंकल्यानंतर समोर कोणताही उमेदवार असला आणि परळी विधानसभेची जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादीने सोडवून घेतल्यास काळ, वेळ दाखवून देऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार विजयी करत गुलाल उधळून दाखवू.
अमरसिंह पंडित, आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस.
भ्रमाचा भोपळा फोडणार
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आणि धनंजय मुंडेंना एकही जागा मिळवू दिली नाही. ग्रामपंचायत, सिरसाळा पंचायत समिती पोटनिवडणुकीचा अपवाद त्यांना भ्रमाचा भोपळा झाला आहे. हा भ्रमाचा भोपळा, गर्वहरण केल्याशिवाय राहणार नाही.
रमेश पोकळे, जिल्हाध्यक्ष, भाजप.