आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूल खचल्याने पालखीला ३५ किलोमीटरचा फेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठणच्या गोदावरी नदीवरील आपेगावचा पूल ८ नोव्हेंबर २०१४ रोजी खचला होता. त्यानंतर पुन्हा चार महिन्यांत अधिक खचल्याने येथून पायी होणारी प्रवासी वाहतूक बंद झाली आहे. पुलावरून आता पायी जाणे अशक्य आहे. यातच ७ जुलैला आपेगाव येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरकडे होणार आहे.

नेहमी अठरा ते वीस दिवसांत पंढरपूरला पोहोचणारी ही पालखी आता आपेगावच्या या खचलेल्या पुलावरून घेऊन जाणे शक्य नसल्याने पालखी यंदा प्रथमच पैठण मार्गे ३५ किमी अंतर दुरून घेऊन जावी लागणार आहे. या मुळे यंदा पालखीचा दोन दिवसांचा मुक्काम वाढणार आहे. नवीन पूल तयार होण्यासाठी किती दिवस लागणार याची प्रतीक्षा आहे. आपेगाव हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जन्मठिकाण आहे. त्यांच्या आजोबांनी आपेगाव ते पंढरपूर पायी वारी येथून सुरू केली होती. आपेगावच्या या पालखीचे महत्त्व पाहता येथील गोदावरी नदीवर १२ वर्षांपूर्वी दोन कोटींच्या वर खर्च करून पूल बांधण्यात आला. मात्र, याच पुलाच्या खालून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा झाल्याने हा पूल गेल्या वर्षी खचला होता. त्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न झाले. मंत्रिमंडळात पुलाचा विषय गाजला. परंतु अद्यापही पुलाचे काम झाले नाही. या रखडलेल्या पुलाचे तत्काळ काम करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील नागरिकातून होत आहे.

माउलीच्या पालखीचे प्रस्थान ७ जुलै रोजी
वर्षभरापासून आम्ही या पुलाच्या नवीन कामासंदर्भात पाठपुरावा करत आहोत. मात्र, त्याला दाद मिळाली नसल्याने आता ३५ किमी दुरून पालखी घेऊन जावी लागणार आहे. पहिल्यांदाच पालखीचा मार्ग बदलावा लागला आहे. - ज्ञानेश्वर महाराज, संस्थान आपेगाव
बातम्या आणखी आहेत...