आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एपीआय पूनम महाजनची गोळी झाडून आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- महिला एपीआय पूनम महाजन यांनी रविवारी त्यांच्या निवासस्थानी औंढा नागनाथ येथे सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली. आपण स्वखुशीने आत्महत्या करीत असल्याने त्यास कुणासही जबाबदार धरू नये, असा उल्लेख असलेली त्यांनी लिहिलेली ‘सुसाइड नोट’ पोलिसांना सापडली असून याबाबत औंढा नागनाथ पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

मूळच्या कोल्हापूर येथील पूनम महाजन (27) विवाह झाल्यानंतर पती तथा औंढा नागनाथचे तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्यासोबत पती-पत्नी समायोजनांतर्गत हिंगोली पोलिस दलात पीएसआय पदावर बदलीवर आल्या होत्या. दीड वर्षापासून गुन्हे शाखा व महिला तक्रार निवारण कक्षात कार्यरत होत्या. गेल्या महिन्यातच त्यांची एपीआय म्हणून पदोन्नतीही झाली होती. कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी त्यांचे पती स्वरूप कंकाळ रविवारी हिंगोलीत आले होते. सकाळी 9.31 वाजता त्यांचे व पूनम महाजन यांचे मोबाइलवर बोलणेही झाले होते.

तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी सुमारे एक ते दीड तास मोबाइल करूनही प्रतिसाद मिळाला नाही. येथील परीक्षेचे काम आटोपून कंकाळ दुपारी 3 च्या सुमारास निवासस्थानी गेले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. पूनम महाजन रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांना दिसून आले. त्यांच्या ताब्यातील सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून उजव्या कानशिलात एक गोळी झाडली असल्याचे दिसून आले.
मृतदेहाजवळच त्यांच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी होती. त्यामध्ये, ‘मी स्वेच्छेने आत्महत्या करीत असून त्याला कुणालाही जबाबदार धरू नये’ अशी नोंद केली आहे.

चिडीमारांवर तुटून पडणारी अधिकारी
पूनम महाजन यांच्याकडे हिंगोलीत दाखल झाल्यापासून महिला सुरक्षा कक्षाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या सुमारे दीड वर्षाच्या कार्यकाळात दसरा, गणपती महोत्सवासह इतर कार्यक्रमांमध्ये महिला, युवतींची छेड काढणार्‍या चिडीमारांना त्यांनी चांगलाच हिसका दाखवला होता. शहरातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात त्या नियमितपणे राउंड मारीत असल्याने चिडीमारांसाठी त्या कर्दनकाळ ठरल्या होत्या. त्यांचे फेसबुक अकांउंट त्यांनी महिला आणि मुलींना तक्रारी करण्यासाठी माहिती देण्यासाठी खुले केले होते.