आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवकाला खडसे कसे विसरले, \'आप\'नेत्याच्या टि्वटने खळबळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वाळूमाफिया सागर चौधरीसारख्या सच्चा सेवकाला एकनाथ खडसे कसे विसरले? अशा आशयाचे टि्वट आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा- मेनन यांनी रविवारी केले. या ट्विटमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. खडसेंच्या वाढदिवशी जळगावात लावण्यात आलेले पोस्टर आणि चौधरीसोबतचे दोन फोटोही मेनन यांनी @aapkipreeti या ट्विटर हँडल वर टाकले. थेट महसूलमंत्र्यांचे छायाचित्र अपलोड केल्यानंतर भाजपच्या गोटातही अस्वस्थता पसरली आहे.
रामानंद पोलिस ठाण्याचे निलंबित निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्या प्रकरणात वाळू व्यावसायिक सागर चौधरीविरुद्धही शनिवारी नाशकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसुलाच्या वसुलीतून एका मंत्र्याच्या समर्थकाकडून वाळूच्या गाड्या सोडण्यासाठी दबाव टाकला जात होता. या मंत्र्याकडून माझ्या पतीचा छळ झाला, असा आरोप सादरे यांच्या पत्नीने शनिवारी नाशकात केला होता. याप्रकरणी खडसे यांना छेडले असता, सादरे प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. त्याचबरोबर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा फलक लावणारा सागर चौधरी हा भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे स्पष्टीकरण खडसे यांनी शनिवारी केले होते.
वाळू व्यावसायिक सागर चौधरी भाजपचा कार्यकर्ता नसल्याचे खडसे यांनी ठामपणे सांगितल्यानंतर मेनन यांनी रविवारी हे टि्वट केले. मेनन यांच्या टि्वटर हँडलवर खडसे यांच्या वाढदिवशी जळगावात लावण्यात आलेल्या एका पोस्टरचा फोटो आहे.

या पोस्टरच्या एका कोपऱ्यात खडसे आणि दुसऱ्या कोपऱ्यात अामदार गुरुमुख जगवानी यांचे छायाचित्र असून मध्यभागी सागर चौधरी आणि अन्य एका वाळू कंत्राटदार राजेश मिश्रा यांची छायाचित्रे आहेत. त्यावर ‘एकनाथ खडसेंचे सच्चे सेवक वाळू माफिया सागर चौधरी आणि मिश्रा हे त्यांना (खडसे ) अजूनही आठवले नाहीत का? असा सवाल मेनन यांनी केला आहे. तसेच दुसऱ्या टि्वटमध्ये एका कार्यक्रमातील छायाचित्र असून यामध्ये खडसे यांना पुष्पगुच्छ देताना चौधरी आणि मिश्रा दिसत आहेत. या टि्वटमध्ये म्हटले आहे की, "खडसेंच्या स्मरणशक्तीला आणखी ताण द्यावा, म्हणून वाळू माफिया चौधरी आणि वाळू कंत्राटरदार मिश्रासोबतचा हा आणखी एक फोटो'.

मेनन यांनी दुपारी टि्वट केल्यानंतर जळगावच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. सादरे प्रकरणानंतर पोलिस दलात आधीच अस्वस्थता पसरली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सागर चौधरीबाबत नवनव्या वावड्या उठत आहेत.

खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात अनेक ठिकाणी त्यांना शुभेच्छा देणारे भले मोठे जाहिरात फलक चौधरी याने लावले होते. त्यामुळेही तो चर्चेत आला होता. या िट्वटमुळे भाजपमध्येही अस्वस्थता पसरली. मात्र, उघडपणे बोलण्यास कुणीही धजावत नव्हते.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी २७ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान टाॅवर चौकात महिलेची छेड काढल्यावरून हाणामारी झाली होती. या प्रकरणात सागर चौधरीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यास अटक केल्यानंतर फोनाफोनी केली होती. त्या वेळेस १५ मिनिटांत सुटेल, असे तो पोलिसांना सांगत होता. त्यामुळे त्याच्यावर कुणाचा वरदहस्त होता? याविषयी तर्कवितर्क केले जात होते. या हाणामारी प्रकरणात परस्परविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.