आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: बनावट नियुक्ती प्रकरण: राज्यातील चार हजार शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- राज्यभरात शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेवर निर्बंध घातलेले असताना या आदेशाला डावलून तत्कालीन शिक्षणाधिकारी, संस्थाचालकांनी ६ हजारांवर शिक्षकांची बनावट भरती केल्याचे तसेच त्यांच्या ऑर्डरही काढल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी शिक्षण विभागाने आतापर्यंत ४ हजार ११ शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द करून त्यांचे पगारही बंद केले आहेत. तसेच यामध्ये गुंतलेल्या संस्थाचालक व शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश झाल्याने संस्थाचालकांसह शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. 
 
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनत असल्याने तसेच आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने २ मे २०१२ रोजी एक आदेश काढून राज्यभरातील खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला थांबवण्याचे आदेश दिले होते. परंतु, या आदेशानंतरही काही संस्थाचालकांनी पेपरला जाहिराती देऊन नव्याने शिक्षक भरती केली. यामध्ये अनेकांनी आर्थिक पातळीवर आपले उखळही पांढरे करून घेतले. दुसरीकडे ही भरती नियमबाह्य असल्याने कारवाई करण्याऐवजी तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी उलट संस्थाचालकांशी संगनमत करून या नियुक्त्यांना मान्यता दिली. दरम्यान, शिक्षण विभागाने शालार्थ ही संगणक प्रणाली सुरू केल्यानंतर अनेक शिक्षकांची नावे प्रणालीमध्ये अपलोड करण्याचे काम सुरू होते. त्या वेळी काही शिक्षकांकडे त्यांची कागदपत्रेच नसल्याचे समोर आले होते. मान्यता देत असताना अनेक अधिकाऱ्यांनी प्रचंड अफरातफर करून मान्यता दिल्याचे उघडकीस आल्यानंतर तत्कालीन शिक्षण आयुक्त धीरजकुमार यांच्या काळात नियमबाह्य मान्यतांच्या चौकशीला प्रारंभ झाला होता. यामध्ये राज्यभरात ६ हजार ९१६ शिक्षकांची बंदी आदेशानंतरही त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे समोर आले. या भरती प्रक्रियेच्या पडताळणीअंती आतापर्यंत त्यापैकी ४ हजार ११ शिक्षकांच्या नियुक्त्या सरकारने तत्काळ रद्द केल्या. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ शिक्षकांचा समावेश   
या प्रक्रियेमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील १६ शिक्षकांचा समावेश असल्याचे समोर आले असून त्यांच्या नियुक्त्या रद्द करून पगार बंद करण्यात आले आहेत. यामध्ये कविता डोके, पाचकुडवे, शिंदे (मराठी कन्या प्रशाला, उस्मानाबाद), सूरज येवले, पूनम मजगे (संत ज्ञानेश्वर विद्यालय, उ,बाद), प्रणित सूर्यवंशी, सगट (स्वामी विवेकानंद शाळा,उमरगा), मुक्ताबाई डोइेफोडे (बसवेश्वर विद्यालय जेवळी), सुवर्णा सगरे-मुंडे (कळंबच्या नगराध्यक्षा), सरोज खटेवाड (विद्याभवन प्रा. शाळा, कळंब), मंढे (जनजागृती प्रा. शाळा, कळंब), गुड्डे (जिजामाता शाळा, तुळजापूर), बाराते (सरस्वती प्रा. शाळा, कळंब) व राऊत, गोरे (नूतन विद्यालय, उस्मानाबाद) या शिक्षकांचा समावेश आहे.

संस्थाचालक, शिक्षण विभागाच्या संगनमतात शिक्षकांचा बळी   
दि.२ मे २०१२ चा शिक्षक भरती बंदीचा आदेश असतानाही संस्थाचालकांनी जाहिराती काढल्या. त्यानुसार शिक्षकांनी अर्ज करून रीतसर प्रक्रियेद्वारे नियुक्त्या मिळवल्या. या नियुक्त्यांना तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनीही मंजुरी दिली. परंतु, संस्थाचालक व शिक्षणाधिकारी यांनी संगनमताने केलेल्या या फसवणुकीत िबचारे शिक्षक बळी ठरल्याने अनेकांनी आता पदरमोड करून कोर्टात धाव घेतली आहे.

उस्मानाबादेतून एका संस्थेची कागदपत्रेच गायब   
हा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. दुसरीकडे या प्रकरणाशी निगडित जिल्ह्यातील एका संस्थेची सर्व कागदपत्रे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातून गायब असल्याचेही समोर येत आहे. त्यातच शासनाने याची गांभीर्याने दखल घेऊन संस्थाचालक व तत्कालीन ९९ शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिल्याने याची किती अंमलबजावणी होणार याकडे लक्ष वेधले आहे.
बातम्या आणखी आहेत...