आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षिकेची आत्महत्या; बीडमध्ये पोलिस ठाण्यासमोरच ठिय्या, पित्याची पोलिसांत तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिकेचा पैशासाठी छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या शिक्षिकेचे नाव सुनीता दत्तू वारे (३५) असे आहे. सासरच्या लोकांवर गुन्हा नोंदवण्यात यावा या मागणीसाठी सकाळी माहेरच्या लोकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.

बीड तालुक्यातील भवानवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुनीता दत्तू वारे या शिवाजीनगर भागातील सुमन अपार्टमेंटमध्ये राहत होत्या. बुधवारी दुपारी चार वाजता घरातील बेडरूमध्ये सीलिंग फॅनला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात नोंद झाल्यांनतर पोलिसांनी दत्तू वारे यांचा जवाब घेतला होता.

सुनीताने आत्महत्या केल्याची माहिती कळताच तिच्या माहेरच्या लोकांनी सकाळी शिवाजीनगर ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती. सुनीताने माहेरहून चारचाकी गाडी व प्लाॅटचे कर्ज फेडण्यासाठी पैसे आणावेत म्हणून सासरचे तिचा शारीरिक व मानसिक छळ करत होते. या छळाला कंटाळून तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

सुनीताचे वडील उमाजी नाथराव ढाकणे (रा. पिंपरी-चिंचवड) यांनी शिवाजीनगर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून सुनीताचा पती दत्तू लक्ष्मण वारे, सासू सरस्वती लक्ष्मण वारे, सासरे लक्ष्मण मारुती वारे व दिगंबर मारुती वारे (रा. खोपटी, ता. शिरूर) या चौघांवर
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आत्महत्या नसून खून केल्याची शिक्षिकेच्या नातेवाइकांची तक्रार
सुनीताने आत्महत्या केलेली नसून तिचा सासरच्या लोकांनी खून केला आहे, असा आरोप माहेरच्या लाेकांनी करत दोषींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची मागणी करत शिवाजीनगर ठाण्यात गुरुवारी सकाळी अकरा वाजता ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर सुनीताच्या माहेरच्या लोकांनी मृतदेह ताब्यात घेतला. सायंकाळी शिरूर तालुक्यातील बावी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.