आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Art Of Living Give Proposal To Remove Sludge From Manjara Dam

मांजरा धरणातील गाळ काढण्याचा प्रस्ताव, आर्ट ऑफ लिव्हिंगचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांतील शेतकरी व अनेक गावांना पिण्याचे पाणीपुरवठा करणा-या मांजरा (धनेगाव) प्रकल्पात साठलेला गाळ काढण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगने प्रस्ताव दिला आहे. सदरचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांमार्फत शासनाकडे ठेवण्यात आला आहे.
येत्या पावसाळ्यात मांजरा धरणात अधिक पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करण्याचा आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रयत्न आहे. मांजरा धरणातून तीन जिल्ह्यांतील अनेक शहरे व गावांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. तसेच शेतीसाठीही पाणी दिले जाते. पण गेल्या अनेक वर्षांपासून मांजरात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परिणामी पाऊसकाळ चांगला झाला तरी धरणात पाणी कमी साचते. महाराष्ट्र शासनाने गाळ काढण्यासाठी यंत्रणा पुरवली आणि तिन्ही जिल्ह्यांतील शेतक-यांना मोफत गाळ घेऊन जाण्यासाठी प्रोत्साहित केले तर याठिकाणी नवीन धरण बांधल्याप्रमाणे फायदा होईल. गाळ काढल्याने जमिनीमध्ये पाणी मुरेल. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्याबरोबरच परिसरातील विहिरींना पाणी लागेल, अशी अपेक्षा आहे. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांना एका शिष्टमंडळाने प्रस्ताव दिला. त्या वेळी महाराष्ट्र शासन व विभागीय आयुक्तांकडे हा प्रस्ताव मांडू अशी हमी जिल्हाधिकारी पोले यांनी दिली. या वेळी आर्ट ऑफ लिव्हिंगचे मकरंद जाधव, त्र्यंबकदास झंवर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, राजेश्वर बुके, महादेव गोमारे आदी उपस्थित होते.
मसलगा धरणात अत्यल्प पाणीसाठा
निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्प ७५ ते ८० टक्क्याहून अधिक कोरडे पडले असून या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या धरणातील गाळ गेल्या उन्हाळ्यामध्ये शेतक-यांनी काढला होता. पावसाळ्यामध्ये पाऊस पडून या प्रकल्पात पाणीसाठा होईल, अशी अपेक्षा होती. पण अत्यल्प पाऊस झाल्याने प्रकल्पात पाणीसाठा एकदम पाळूजवळच आहे.