नांदेड- देशाच्या विविध भागांत कोट्यवधी रुपये किमतीचे आश्रम उभे करून 10 हजार कोटींची माया जमवणार्या आसारामबापूंनी नांदेड जिल्ह्यातही शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून आश्रम उभारल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या आश्रमासाठी पिंपळगाव महादेव या गावातील साडेचार एकर जमिनीवर अतिक्रमण केले आहे.
शहरापासून अवघ्या 10 कि. मी. अंतरावर असलेल्या पिंपळगाव महादेव हे सधन कास्तकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावात जमिनीला पंचरत्नापेक्षाही अधिक भाव आहे. याच गावातील गट क्र. 74 वर आसारामबापूंनी साडेचार एकर शासकीय जमीन अतिक्रमित करून आश्रमाची उभारणी केली आहे.
योगवेदांत सेवा समितीच्या नावावर या आश्रमाची उभारणी त्यांनी केली आहे. जवळपास 2000- 03 या कालावधीत आश्रमाची उभारणी केली. या काळात आसारामबापूंचे देशात मोठे प्रस्थ होते. त्या काळात जमिनीवर अतिक्रमण करून हा आश्रम उभा केला. आश्रमाची जमीन आजच्या बाजारभावाप्रमाणे जवळपास दीड ते दोन कोटींच्या घरात आहे.
फाइल दप्तरबंद केली
योगवेदांत सेवा समितीने जमिनीची मागणी केली होती. जमीन देता येत नाही, असे स्पष्ट लेखी निर्देश देऊन ही फाइल बंद केली.आसारामबापूंच्या आश्रमाला जिल्हा प्रशासनाने कोणतीही जमीन दिली नाही. त्यानंतर या संबंधात कोणतीही मागणी अथवा तक्रार जिल्हा प्रशासनाकडे आलेली नाही.
- डॉ. निशिकांत देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी
जमीन शासकीयच
आश्रम उभारणीनंतर योगवेदांत सेवा समितीने जमिनीसाठी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज केला. जिल्हाधिकार्यांनी तो शासनाकडे पाठवला. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांनी 18 ऑगस्ट 2011 रोजी सर्वोच्च् न्यायालयाच्या 28 जानेवारी 2011 च्या निर्णयानुसार जमीन देण्यास नकार दिला. तेव्हापासून ही फाइल बंद करण्यात आली.