आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार: जोगवा मागून अनाथ, निराधार महिलांना सांभाळणारी आशाबाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून तीन वर्षांत माहेरी आलेल्या आष्टी तालुक्यातील हरिनारायण आष्टा गावाच्या आशाबाई गायकवाड यांनी जोगवा व मोलमजुरी करून सध्या नऊ निराधार महिला अाणि एका वृद्धाचा सांभाळ करत त्यांच्यामध्ये जीवन जगण्याची नवी आशा जागवली आहे.

आशाबाई राक्षे यांनी जोगवा आणि मोलमजुरी करून दहा निराधारांचा एकत्रितपणे मोठ्या हिमतीने सांभाळ करत मायेची ऊब दिली आहे. हरिनारायण आष्टा येथील मच्छिंद्र राक्षे यांची मुलगी आशाबाई यांचे नगर येथील बंडू गायकवाड यांच्याशी १८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पतीच्या त्रासाला कंटाळून तीन वर्षांतच दीड वर्षाची मुलगी राजश्री व सहा महिन्यांचा मुलगा भाऊसाहेब या दोघांना बरोबर घेऊन त्या माहेरी आल्या. सुरुवातीला मोलमजुरी करत त्यांनी चहाचे हॉटेल सुरू केले. आशाबाईंनी स्वत:च्या कमाईतून नगर-बीड राज्य महामार्गावरील फाट्यावर एक एकर जमीन खरेदी करून या जमिनीत श्री दत्त व स्वामी समर्थांचे मंदिर बांधले. २०१३ मध्ये त्यांच्याकडे हिवरा येथील वयोवृद्ध देऊबाई रावसाहेब लगड या कौटुंबिक वादातून आशाबाई यांच्याकडे आल्या. तेव्हा आशाबाईंनी त्यांची समजूत काढत त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. परंतु त्या घरी गेल्याच नाहीत. त्या येथेच आशाबाईंबरोबर राहू लागल्या. यानंतर लीलाबाई रघुनाथ गायकवाड (६७), रखमाबाई लालू गुंजाळ (६५), आदिनाथ बाबूराव राक्षे (७७), अंध बबई जगन्नाथ इटकर (६५), पारूबाई बापू माने (६२), राधाबाई तायराम लामरूड (५५), समाबाई शंकर गुंजाळ (७०), सुमनबाई बापू नागरगोजे (६३), मुक्ताबाई बापू लामरूड (६५) अशा महिला व पुरुषांचा सांभाळ आशाबाई करताहेत. शेतात काम करून त्या दवाखान्याचा खर्च भागवतात. जर मंगळवार व शुक्रवारी रोजंदारीचे काम मिळाले नाही तर त्या गावात जोगवा मागून आठवड्याचे अन्नधान्य जमवतात.
लग्नासाठी किराणा दिला
२०१० मध्ये आशाबाई यांनी मुलगी राजश्रीचे लग्न केले. या लग्नातील शिल्लक राहिलेला किराणा शेजारी राहत असलेल्या अमिना व शम्मुभाईची मुलगी रुबिनाच्या लग्नासाठी दिला. दरम्यान, प्रत्येक सोमवारी आशाबाई या आष्टी तहसील कार्यालयात जावून आष्टा, चिंचपूर, मंगरूळ, कडा या परिसरातील निराधार, अपंग, परित्यक्ता, विधवा यांच्या निवृत्तिवेतनासाठी प्रयत्न करतात.
वीटभट्टी मजुरांसाठी जमीन गहाण
वीटभट्टीवरील मजुरांना कर्ज काढून देण्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन गहाण ठेवली. मात्र, वीटभट्टीवरील कामगार रक्कम न फेडता निघून गेल्याने आता त्यांची जमीन बँकेकडे गहाण आहे. निघून गेलेले मजूर कर्ज फेडतील, असा विश्वास अजूनही त्यांना आहे.