आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाण समर्थकांचे दिल्लीकडे उड्डाण; 200 कार्यकर्ते रवाना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात सीबीआयने आरोपपत्र दाखल केल्यानंतर चव्हाण समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीला वाट मोकळी करून देण्यासाठी व चव्हाणांचे समर्थन करण्यासाठी काँग्रेस हायकमांडच्या भेटीला नांदेडातून 200 कार्यकर्ते व पदाधिकारी दिल्लीला रवाना झाले आहेत.
आदर्शप्रकरणी सीबीआयने चव्हाण यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केल्यामुळे चव्हाण यांच्यावर अन्याय झाल्याची तसेच पक्षश्रेष्ठी पाठीशी उभे नाहीत, अशी भावना चव्हाण समर्थक कार्यकर्त्यांच्या मनात तयार झाली आहे. संयमी असलेले अशोक चव्हाण आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कमालीचे संतप्त झाले. मला राजकीय जीवनातून उठविण्याचा हा विरोधकांचा डाव आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया त्यांनी प्रसारमाध्यमांपुढे दिली. हे प्रकरण काँग्रेस हायकमांडपर्यंत नेण्याची रणनीती ठरविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत 42 आमदारांनी चव्हाणांचे समर्थन करून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, त्यांना एकटे पाडू नका, असा दम मुख्यमंत्र्यांना भरला. तोंडावर विधान परिषद निवडणूक व राष्ट्रपती निवडणूक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी पक्ष चव्हाणांच्या पाठीशी असल्याचे सांगून आमदारांना शांत केले. १२ जुलै रोजी सायंकाळी सोनिया गांधी यांनी भेटीची वेळ दिली आहे. त्यात बदलही होऊ शकतो अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी दिली. सोमवारपासूनच नांदेड येथून विमानाने व रेल्वेने समर्थकांचे जत्थेच्या जत्थे दिल्लीकडे रवाना होत आहेत. नांदेड येथून विमान फुल्ल असल्याने काही जण हैदराबाद येथून विमानाने रवाना झाले आहेत, तर बहुतांश समर्थक बुधवार व गुरुवारी सकाळी रवाना होणार आहेत.
कार्यकर्त्यांत चढाओढ - नांदेड महापालिका निवडणूक येत्या ऑक्टोबरमध्ये आहे. सध्या काँग्रेस व अशोक चव्हाण चलनी शिक्का आहे. उमेदवारीची सर्वात जास्त मागणी काँग्रेसकडेच आहे. त्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी भावी उमेदवारांत स्पर्धा लागली आहे. अशोक चव्हाणांवर निष्ठा दाखविण्याची ही नामी संधी असल्यामुळे दिल्लीला जाण्यासाठी कार्यकर्त्यात चढाओढ लागली आहे. आपल्यासाठी कोण आले, कोण आले नाही याची बारीक तपासणी अशोक चव्हाण करतात याचीही भीती कार्यकर्त्यांत आहे.
श्रेष्ठींपुढे भावना मांडणार- अशोक चव्हाण आमचे नेते आहेत. त्यांच्यामुळे 2009 मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. स्व. शंकरराव चव्हाण व अशोक चव्हाण यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षासाठी त्याग केला आहे. आदर्शचे भांडवल करून त्यांचे राजकीय जीवन संपुष्टात आणणे योग्य नाही. आमच्या मनातील भावना पक्षश्रेष्ठींसमोर मांडणे आमचे कर्तव्य आहे.’’ - दिलीप पाटील बेटमोगरेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष नांदेड.
माजी मुख्यमंत्री असुरक्षित तर आमची काय कथा? ४२ आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घेरले!