आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जात पाहून कर्जमाफी देणारे सरकार जास्त टिकणार नाही; अशोक चव्‍हाण यांचा घणाघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेली कर्जमाफी फसवी आहे. कर्जमाफी देतानाही हे सरकार जात बघून कर्जमाफी देत आहे. म्हणूनच कर्जमाफीच्या  अर्जातही जात नमूद करावी लागत असल्याने हे सरकारच फसवे असल्याने टिकणार नाही, अशी घणाघाती टीका माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी आज येथे केली.   

काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी ८ सप्टेंबरला नांदेड येथे येत अाहेत. या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण बोलत होते. या वेळी महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारूलता टोकस, काँग्रेसचे गटनेते आमदार शरद रणपिसे, आमदार डी. पी. सावंत, अमर राजूरकर आदी उपस्थित होते.  ते पुढे म्हणाले, की भाजप सध्या फोडाफोडीचे राजकारण करत आहे. प्रलोभने दाखवून कुणालाही पक्षात प्रवेश देण्यात येत आहे, हे देशाच्या प्रतिमेला काळे फासणारी कृती आहे. विरोधी पक्षातीलच नव्हे तर घटक पक्षातील लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांना फोडून भाजपमध्ये घेतले जात अाहे. 
  
काँग्रेसने  समविचारी पक्षांना सोबत घेऊन संघर्ष यात्रा काढली. त्यामुळे सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. सध्या जीएसटी या करप्रणालीमुळे व्यापारी धास्तावले आहेत. त्यांच्यात असंतोषाची भावना आहे. मुळात जीएसटी ही करप्रणालीच अडचणीची ठरत आहे. नोटाबंदीही चुकीच्या पद्धतीने केल्यामुळे काळा पैसा बाहेर आलाच नाही. रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनेच नोटाबंदी कशी फसवी होती, ते आता लक्षात आले, असेही चव्हाण यांनी या वेळी सांगितले.   हा मेळावा नांदेडमधील नवा मोंढा मैदानावर सकाळी नऊ वाजता होणार आहे. मेळाव्यास विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. मेळाव्यानंतर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दुपारी परभणी येथे संघर्ष सभा होणार अाहे. 
 
हम लढेंगे..हम जितेंगे..   
आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात अशोक चव्हाण म्हणाले, नांदेड महापालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे व काँग्रेसच्याच ताब्यात राहील. मनपावर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी हम लढेंगे..हम जितेंगे, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युतीचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेतृत्वाला दिलेले आहेत. त्यामुळे युतीसाठी कुणी बोलण्यास पुढे आले तर आम्ही तयार अाहोत, असेही ते म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...