आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटांप्रमाणे सत्ताधारीही बदलण्याची वेळ : अशोक चव्हाण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोकरदन - राष्ट्रवादी व भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या भानगडीत मतदारांनी पडू नये. गेल्या दोन वर्षांत जनतेच्या हिताचा एकही निर्णय भाजप सरकारने घेतला नाही. शेतकऱ्यांचे कर्ज माफ न करता विजय मल्ल्यासारख्यांचे कर्ज माफ केले. या धोरणामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, सर्व जनतेत सरकारविरुद्ध तीव्र संताप आहे. सध्या झालेल्या बदललेल्या नोटांबरोबरच सरकार बदलण्याची वेळ आली आहे. नगरपालिका निवडणुकीतून बदल घडवावा, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकरदन येथे जाहीर प्रचार सभेत केले.

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन येथे झालेल्या प्रचार सभेप्रसंगी चव्हाण बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री वर्षा गायकवाड, खासदार हुसेन दलवाई, आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार संतोषराव दसपुते, रेखा पगारे, माजी नगराध्यक्ष अॅड. हर्षकुमार जाधव, राजाभाऊ देशमुख, उमेदवार मंजूषा देशमुख, एल. के. दळवी, राहुल देशमुख, संतोष अन्नदाते आदींची उपस्थिती होती. नोटाबंदीचा त्रास सामान्य जनतेलाच होत आहे. सरकारच्या निर्णयाविरुद्ध बोलणाऱ्याला देशद्रोही ठरवले जाते. जनतेचा कष्टाचा पैसाही त्यांना काढता येत नाही, सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याचे चव्हाण यांनी शेवटी सांगितले. प्रास्ताविक राजाभाऊ देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन हर्षकुमार जाधव यांनी केले, तर सोपान सपकाळ यांनी आभार मानले.

मन की बातपेक्षा मतलब की बात
भोकरदन येथे झालेल्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी एक दिवस मुंबईत १०० रुपये किलोने डाळीचे पाकीट वाटले. नंतर ते गेले कुठे? डाळ काही स्वस्त झाली नाही, मिळालीही नाही. मन की बात करणाऱ्यांना या निवडणुकीत तुम्ही मतलब की बात करून सत्तांतर घडवा, असे आवाहन त्यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...