आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan News In Marathi, Bhaskarrao Khatgaonkar, Lok Sabha

खतगावकर निवडणूक लढवणार नसल्याने अशोक चव्हाणांचा लोकसभेचा मार्ग खुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेडमधील काँग्रेसचे खासदार भास्करराव खतगावकर यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे शुक्रवारी जाहीर केले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना किंवा त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जाते.


पक्ष व देश संकटात असल्यामुळे आपण निवडणुकीच्या स्पर्धेत नसल्याचे त्यांनी सांगितले. ‘35 वर्षे मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम केले. माझ्यासोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. मात्र, मी कधीही गटबाजीचे राजकारण केले नाही. यापुढेही कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आहे. पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याला विजयी करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करीन’, असेही त्यांनी सांगितले.निवडणुका जाहीर झाल्यापासून खतगावकर दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र, यंदा त्यांचे तिकीट कापले जाण्याची चर्चा होती. मात्र, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी माघार घेतल्याने आता नव्या उमेदवाराबाबत उत्सुकता आहे.

नांदेडच्या जागेबाबत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, अमिता चव्हाण व भास्करराव पाटील खतगावकर अशी तीनच नावे चर्चेत होती. यातून कोणाला उमेदवारी द्यावी, याचा निर्णय होत नसल्याने काँग्रेस पक्षातर्फे शुक्रवारपर्यंत उमेदवार जाहीर होऊ शकला नाही. अशातच गुरुवारी रात्री शहरात दाखल झाल्यानंतर खासदार पाटील यांनी शुक्रवारी सकाळीच माघारीचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे हा निर्णय जाहीर करण्यास त्यांना पक्षश्रेष्ठींतर्फेच सांगण्यात आले असावे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. मात्र, भास्करराव पाटील यांनी कोणत्याही प्रश्नावर उत्तर देण्यास स्पष्ट नकार दिला. विद्यमान खासदारांनी माघार घेतल्याने आता अमिता चव्हाण अथवा पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्यापैकी एकाच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विद्यमान खासदाराच्या माघारीसंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.