आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashok Chavan News In Marathi, Congress, Divya Marathi

अशोक चव्हाणांचे डॅमेज कंट्रोल, भोकरमधील पक्ष सोडणा-यांसाठी घेतली बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - शहरात गुरुवारी राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. भोकर तालुक्यातील पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या सरपंचांना थोपवण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वसंतनगरातील प्रगती महिला मंडळाच्या सभागृहात बंदद्वार बैठक घेतली. त्याला लागूनच असलेल्या बाबानगरात माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या घरी चार तालुक्यांतील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश पार पडले.

भोकर तालुक्यातील ४५ सरपंच पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा खतगावकरांनी केला आहे. भोकरमधील काही नगरसेवक, नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चाही होती. या मतदारसंघातून अमिता चव्हाण या संभाव्य उमेदवार आहेत. त्यामुळे पक्षफुटीचा फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण गुरुवारी तातडीने शहरात दाखल झाले. भोकर तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृउबा सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक घेतली. पत्रकारांना या बैठकीला प्रवेश नाकारण्यात आला.

सरपंच फुटणार ही बातमी प्लॅन केलेली : चव्हाण
या बैठकीनंतर ‘दिव्य मराठी’शी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, भोकरमध्ये कोणताही प्रॉब्लेम नाही. तालुक्यातील सर्व सरपंच बैठकीला हजर होते. कोणत्याही कार्यकर्त्यात नाराजी नाही. सरपंच फुटणार ही बातमी प्लॅन केलेली आहे. त्यात तथ्य नाही.

सरपंचांना निमंत्रण दिले नाही
भाजपत प्रवेश करणा-या कोणत्याही सरपंचांना मी बोलावले नाही. त्यांनी स्वत: मला फोन करून निर्णय कळवला. मी गावात नसल्यामुळे त्यांनी दोन दिवस वाट पाहिली. माझ्याकडे येण्यापूर्वी ४५ सरपंच सत्य गणपती मंदिरात गेले. तिथे त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत जाण्याबाबत शपथा घेतल्या. माझी माहिती आहे, ज्या ४५ सरपंचांनी पक्ष सोडण्याच्या निर्णय घेतला त्यातील केवळ ४-५ सरपंच प्रगती महिला मंडळातील बैठकीला उपस्थित होते.
भास्करराव पाटील खतगावकर, माजी खासदार, नांदेड