आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashok Chavan News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेड जिल्ह्यावर वर्चस्व ठेवणे चव्हाणांसमोर आव्हान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील काही मतदारसंघात बंडखोरी तर काही ठिकाणी काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. २००९ च्या निवडणुकीत संपूर्ण काँग्रेसमय झालेल्या जिल्ह्यात या वेळी राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. २००९ च्या निवडणुका मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढल्या गेल्या. त्यांच्या प्रभावामुळे जिल्ह्यातील सर्व ९ मतदारसंघात आघाडीचे उमेदवार (२ राष्ट्रवादी, ७ काँग्रेस) विजयी झाले. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. पण बदलत्या राजकीय परिस्थितीत संपूर्ण जिल्हा ताब्यात ठेवणे त्यांच्यासमोर
मोठे आव्हान आहे.
नांदेड उत्तर पालकमंत्री डी.पी.सावंत यांचा हा मतदारसंघ. स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, शहरात झालेली विकासकामे व प्रबळ विरोधी उमेदवार नसल्याने त्यांना या निवडणुकीतही फारसे आव्हान असण्याची शक्यता नाही. नांदेड दक्षिणमध्ये आमदार ओमप्रकाश पोकर्णा गेल्या निवडणुकीत स्वबळावर विजयी झाले. मतदारसंघातील मुस्लिम मते एकगठ्ठा मिळाली. यंदा एमआयएम पार्टी पहिल्यांदाच निवडणुकीत आहे. प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन हेच त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी आहेत. मुस्लिम मताची विभागणी होणार असल्याने पोकर्णा यांना या वेळी चांगले परिश्रम घ्यावे लागतील.
लोह्यत माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचे विद्यमान आमदार शंकरअण्णा धोंडगे समोर आव्हान आहे. प्रताप पाटील चिखलीकर या वेळी महायुतीतर्फे आहेत.देगलूरमध्ये रावसाहेब अंतापूरकर गेल्या वेळी मुख्यमंत्रिपदाच्या हवेत विजयी झाले. महायुतीजवळ अंतापूरकरांच्या विरोधात प्रबळ स्थािनक उमेदवार नाही. हीच अंतापूरकरांची जमेची बाजू आहे.
नायगावमध्ये राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य वसंत चव्हाण यांनी बंडखोरी करून विजय मिळवला. आमदार बापूसाहेब गोरठेकरांचा पराभव केला. अशोक चव्हाणांची रसद मिळाल्याने चव्हाण विजयी झाले. या वेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर बंडखोरीच्या तयारीत आहेत.
हदगावमध्ये काँग्रेसचे माधवराव पाटील जवळगावकर यांना या वेळी काही प्रमाणात संधी आहे. महायुतीचा उमेदवार कोण यावर त्यांचे भवितव्य आहे. परंतु विकासकामे व जनसंपर्कामुळे जवळगावकरांचे पारडे जड आहे. मुखेडमध्ये हनमंतराव पाटील बेटमोगरेकरांना चांगलेच जड जाणार आहे. लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांसारखा तगडा उमेदवार असूनही ११ हजार मताने मागे राहिले. त्यामुळे काँग्रेसला अधिक चिंतेत टाकणारा हा मतदारसंघ आहे.
किनवटमध्ये राष्ट्रवादी आमदार प्रदीप नाईक सलग दोनवेळा विजयी झाले. बंजारा समाजाची गठ्ठा मते त्यांचे बलस्थान आहे. महायुतीतर्फे डाँक्टर बी.डी.
चव्हाण यांचे नाव चर्चेत आहे.
भोकरमध्ये प्रतिष्ठा पणाला
भोकर मतदारसंघात अमिता चव्हाण यांची उमेदवारी निश्चित आहे. अशोक चव्हाणांसाठी ही प्रतिष्ठेची जागा आहे. विजयासाठी ते सर्व शक्ती पणाला लावतील. विरोधक मात्र त्यांना मतदारसंघात अडकवून ठेवू शकतात.