आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमर राजूरकर यांच्या विजयाने अशोक चव्हाणांची प्रतिमा उजळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अमर राजूरकर यांना विजय मिळवून देत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी आपला गड राखला. या निवडणुकीत चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्याने आणि विरोधकांनी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी मोर्चेबांधणी केल्याने राजकीय वर्तुळाचे या लढतीकडे लक्ष लागले होते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचे अमर राजूरकर व अपक्ष श्यामसुंदर शिंदे यांच्यात थेट लढत झाली.
अमर राजूरकर अशोक चव्हाणांचे उजवे हात मानले जातात. २००९ मध्ये स्थानिक काँग्रेस नेत्यांचा विरोध डावलून चव्हाणांनी राजूरकरांना विधान परिषदेत पाठविले. त्या वेळी चव्हाण मुख्यमंत्रिपदी असल्याने ती निवडणूक अविरोध झाली. चव्हाणांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रभावामुळे विरोधाचा एकही सूर उमटला नाही. या वेळी मात्र विरोधकांनी चांगलीच मोर्चेबांधणी केली. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे तिन्ही पक्ष एकत्र आले. त्यांनी शिंदे यांना पाठिंबा दिला. चव्हाणांचे मेहुणे व माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांसह शिवसेनेचे चार आमदार, माजी खासदार गंगाधरराव कुंटूरकर, माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर, ओमप्रकाश पोकर्णा असे दिग्गज नेते चव्हाणांविरोधात आघाडी करून उभे राहिले. अशोक चव्हाणांविरोधात सर्व एकजूट असे चित्र उभे राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एकूण ४७२ मतांपैकी सर्वाधिक काँग्रेसची २०१ मते होती. राष्ट्रवादी काँग्रेसची १०६, शिवसेना ५८ व भाजपची १० असे संख्याबळ असल्याने काँग्रेसची स्थिती मजबूत मानली जात होती; परंतु काँग्रेसची जवळपास १५-२० मते फुटण्याच्या स्थितीत होती. महापालिकेतील काही नगरसेवक केवळ तांत्रिकदृष्ट्या पक्षात होते. त्यांची मते शिंदेकडेच वळतील हे उघड होते. या फाटाफुटीत काँग्रेसला दगाफटका
होऊ शकतो, असा विरोधकांचा दृढ विश्वास होता. त्यामुळेच ऐन थंडीच्या दिवसातही राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापत होते.

चव्हाणांची मुत्सद्देगिरी
अशोक चव्हाणांनी परिस्थिती पाहून निवडणुकीची सूत्रे हाती घेतली. सर्वप्रथम एमआयएमच्या नगरसेवकांना आपल्या तंबूत ओढले. राष्ट्रवादीचा शिंदे यांना पाठिंबा होता. परंतु किनवटचे राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक मात्र महायुतीपासून दूर होते. त्यांच्यामागे किनवट, माहूर तालुक्यातील ३८ मते होती. हे हेरून मुत्सद्देगिरीने त्यांनी ही मते आपल्या बाजूने वळवली. प्रताप पाटलांचे कट्टर विरोधक राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांची तीन मतेही त्यांनी आपल्या बाजूने वळविली. याशिवाय इतरही काही मते आपल्या बाजूने वळवत त्यांनी राजुरकरांचा विजय निश्चित केला. प्रदेशाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर असतानाही चव्हाणांनी सर्वाधिक वेळ राजुरकरांसाठी दिला. याचे प्रमुख कारण राजूरकर चव्हाणांचे केवळ घनिष्ठ मित्र आहेत एवढाच नसून प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात काँग्रेसला दगाफटका झाला तर चव्हाणांच्या राजकीय कारकिर्दीसाठी तो मोठा अडथळा ठरला असता याची जाणीव त्यांना होती. राजूरकरांचा पराभव जिल्ह्याच्या राजकारणात चव्हाणांच्या राजकीय वाटचालीला घसरणीला लावणारा ठरला तर असताच, राज्याच्या राजकारणातही त्यांना किंमत मोजावी लागली असती. सर्व विरोधक एकत्र येऊन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत प्रत्यक्ष लक्ष घालूनही काँग्रेस विजयी झाली. त्यामुळेच या निवडणुकीत राजूरकरांच्या विजयाने चव्हाणांची प्रतिमा उजळून निघाली.
बातम्या आणखी आहेत...