आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashok Patil Contests Against Pritam Munde For Beed Lok Sabha Constituncy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गोपीनाथ मुंडेंचे राजकीय मित्रच प्रीतमच्या विरोधात, काँग्रेसचे अशोक पाटील रणांगणात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकीय क्लृप्त्या करून जमवलेल्या मैत्रीला जागत आयुष्यभर साथ देणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री अशोक पाटील मुंडेंच्या निधनाने रिक्त झालेल्या जागी डॉ. प्रीतम मुंडे-खाडे यांच्या विरोधात मैदानात उतरले. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राष्ट्रवादीचे राज्यमंत्री सुरेश धस यांचा एक लाख ३६ हजारांवर मतांनी पराभव केला. केंद्रात मोदी सरकार आरूढ झाल्यानंतर खासदार गोपीनाथ मुंडे केंद्रात ग्रामविकास मंत्री झाले; मात्र आठच दिवसांत त्यांच्या अकाली निधनाने बीड लोकसभेची पोटनिवडणूक अटळ झाली.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्षातून यशाचा मार्ग चोखाळताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याप्रमाणे जिल्ह्यातही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध ठेवले. यात माजी मंत्री अशोक पाटील यांचा अग्रभागी क्रमांक लागतो.
१९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री अशोक पाटील यांची पत्नी रजनीताई पाटील यांना ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपत आणून लोकसभेची उमेदवारी दिली आणि सुमारे ५७ हजारांवर मतांच्या फरकाने निवडूनही आणले, परंतु केंद्रात स्थापन झालेले अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकार अवघ्या तेरा दिवसांत गडगडले आणि ही संधी साधून रजनीताई पाटील यांनी भाजपचा त्याग करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी जवळीक केली. १९९८ आणि १९९९ मध्ये झालेल्या निवडणुकीत रजनीताई पाटील यांच्याऐवजी त्यांचे पती अशोक पाटील काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरले, परंतु त्यांना दोन्ही वेळा अनुक्रमे सोळा हजारांनी, तर दुस-यांदा सुमारे एक लाख ७० हजार ४६८ मतांच्या फरकाने पराभूत व्हावे लागले.
निवडणुकीतील हार-जित महत्त्वाची न मानता अशोक पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याशी असलेले ऋणानुबंध कायम ठेवले. प्रत्येक निवडणुकीत अन्य पक्षातील मित्रांप्रमाणे अशोक पाटील यांनी गोपीनाथ मुंडे यांना सहकार्याची भूमिका ठेवून मदतच केली. या दोन्ही नेत्यांमधील मैत्रीपूर्ण संबंधाचा उल्लेखही मुंडेंच्या हयातीत आणि आताही अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळतो.

सगळ्यांच्याच भुवया एकदम उंचावल्या
लोकसभा निवडणुक (२०१४) राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आणि काँग्रेसकडूनही राष्ट्रवादीला मदतीचेच फर्मान सुटले; परंतु त्याही वेळी पाटील दांपत्यांकडून मुंडेंसाठी मदतीचा हात पुढे झाला. मात्र मुंडेंच्या निधनाने रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीच्या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी संपुष्टात येताच अशोक पाटील रिंगणात उतरले आणि सगळ्यांच्याच भुवया एकदम उंचावल्या.