लातूर - आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील संजय ऊर्फ बुट्टा शिवराम गायकवाड यांचा गोळ्या घालून खून करणार्या मल्लिनाथ ऊर्फ अप्पा मच्छिंद्र सोनवणे (38, रा. मानेवाडी, ता. केज) यास लातूर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी रात्री शहरात करण्यात आली. ही माहिती पोलिस अधीक्षक बी.जी.गायकर यांनी दिली.
सोनवणेकडून गावठी रिव्हॉल्व्हर, तीन काडतुसे व इंडिका कारही जप्त करण्यात आली आहे. त्याला रात्रीच आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गायकवाड यांचा 12 दिवसांपूर्वी भरदिवसा खून झाला होता. तेव्हापासून सोनवणे फरार होता. तो लातुरात साई रोड भागात दहिरे यांच्या वाड्यात राहत असल्याची माहिती आष्टीच्या उपविभागीय पोलिस अधिकार्यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी लातूरचे पोलिस अधीक्षक बी.जी. गायकर यांच्याशी संपर्क साधला. गायकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर व डीबी पथकाला सोनवणेच्या अटकेची जबाबदारी सोपवली. पोलिसांनी अत्यंत चलाखीने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या.
बावकर यांनी आपल्या कर्मचार्यांसह साई रोड भागात सापळा रचला. त्या वेळी सोनवणे हा दहिरे यांच्या घरासमोर उभा असल्याचे दिसले. त्यांनी त्याच्याजवळ जाऊन तोच असल्याची खात्री केली. त्यानंतर त्यास तत्काळ ताब्यात घेण्यात आले. त्या वेळी त्याच्या कमरेला पिस्टल पोचमध्ये गावठी रिव्हॉल्व्हर आढळले. तसेच त्याच्याकडे तीन जिवंत काडतुसे आणि चार मोबाइलही सापडले. हे सर्व पोलिसांनी जप्त केले.