आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assault News In Marathi, Vadvani, Grampanchayat, Divya Marathi

छेड काढणारे टोळके सोडून विधवेलाच दंड,गावपंचायतीचा अजब फतवा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी - पतीच्या निधनानंतर भाड्याने राहणा-या विधवेची छेड काढणा-या टोळक्याला सोडून महिलेला गावपंचायतीने वीस हजारांचा दंड ठोठावला आणि गाव सोडून जाण्यास भाग पाडल्याची घटना वडवणी तालुक्यातील खडकी देवळा येथे घडली. याप्रकरणी वडवणी पोलिसांनी दहा जणांवर छेडछाड व अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.


खडकी देवळा येथील महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. यानंतर ही महिला गावातच राहत होती. पंधरा दिवसांपासून गावातील काही जण तिची छेड काढत होते. 15 मार्च रोजी सकाळी आठ वाजता सुनील चोले, पोलिस पाटील वचिष्ट करांडे, अनिल चोले, छबूराव चोले, चंदू चोले, बाबा चोले, महादेव नागरगोजे, बन्सी चोले, पांडुरंग चोले, बाळू चोले यांनी छेड काढून जातिवाचक शिवीगाळ केली. महिलेने वडवणी पोलिस ठाणे गाठले; परंतु पोलिसांनी महिलेची तक्रार न घेता पोलिस पाटलाच्या सांगण्यावरून तिला ठाण्यातून हाकलून दिले. दरम्यान, खडकी देवळ्यात पोलिस पाटील वचिष्ट करांडे याने गावपंचायत बोलावली. महिलेलाच वीस हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. याशिवाय तिलाच गाव सोडून जाण्यास भाग पाडले. महिलेने थेट जिल्हा पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेतली. त्यानंतर 20 मार्च रोजी वडवणी पोलिसांनी छेड काढणा-यांविरूद्ध गुन्हा नोंदवला.


पोलिसांवरही कारवाई करा
महिलेची पोलिसांनी तक्रार घेतली नाही. आम्ही पोलिस अधीक्षकांना भेटलो. त्यानंतर महिला वडवणी ठाण्यात 18 मार्चला गेली. पोलिसांनी तिला पहाटे तीनपर्यंत थांबवून ठेवले. महिलेला रात्री ठाण्यात थांबवता येत नाही. पोलिसांवर कारवाई करायला हवी.’ - मनीषा तोकले, मानवी हक्क अभियान


सुरुवातीला अर्ज दिला
महिला 15 मार्चला आली होती; परंतु त्या वेळी तिने केवळ अर्ज दिला आणि पोचपावती मागत होती तसेच केवळ चौकशी करा, असे म्हणून गेली. त्यानंतर ती 18 मार्चला पुन्हा आली. गुन्हा दाखल करा म्हणाली. त्यानुसार गुन्हा दाखल केला.’सुरेश साबळे, सहायक पोलिस निरीक्षक, वडवणी