आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assembly Opposition Leader Ekanath Shinde Visit Osmanabad Lass Field

दुष्काळी दौरा: निसर्गाने मारले, शासन दुर्लक्ष करतेय... आम्ही जगायचे कसे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. लोहारा तालुक्यातील आरणी येथील शेताची पाहणी करताना आमदार शिंदे, विजय शिवतारे, अनिल खोचरे, ज्ञानराज चौगुले आदी.)
उस्मानाबाद- "साहेब, कमी पावसामुळे खरिपाची पिके वाया गेली. पेरणीचा खर्चही निघाला नाही. त्यात जमिनीत ओल नसल्याने रब्बीची पेरणी झाली नाही. निसर्गाने मारल्यानंतर शासनही दुर्लक्ष करत आहे. जनावरे कशी जगवावी याची चिंता सतावत आहे. अडचणीच्या काळात शासन मदत करत नसल्याने आम्ही जगायचे कसे?' असा सवाल लोहारा तालुक्यातील आरणी, कानेगाव, भातागळी आदी गावांतील शेतकऱ्यांनी विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांना केला.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील आमदारांच्या शिष्टमंडळाने रविवारी जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली. या पथकाने लोहारा तालुक्यातील आरणी गावास भेट दिली. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती पाहून नेतेही अवाक् झाले. आरणीतील शेतकरी कालिदास दरेकर यांच्या शेताला भेट देऊन शिंदे यांनी त्यांची विचारपूस केली. पावसाअभावी खरिपाची पेरणी झाली नाही. माणसे जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही. असे असतानाही पिकाची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा जास्त दाखवण्यात आल्यामुळे धड आम्हास मदतही मिळत नाही, तसेच शासनाकडून सवलतीही मिळत नाहीत. त्यामुळे जगायचे कसे, असा सवाल या शेतकऱ्यांनी शिंदे यांच्याकडे केला. काहीही करा साहेब; पण आम्हाला मदत करा, असा टाहो या शेतकऱ्यांनी फोडला. त्यानंतर हे पथक लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे रवाना झाले. त्याच वेळी आपल्या लेकरापेक्षाही जिवापाड जपलेल्या बैलांचा आता आपण सांभाळ करू शकत नसल्याने शेतकरी बळवंत भिसे त्याच्याजवळील दोन बैल विक्रीसाठी बाजारात नेत होता. शिंदे यांनी भिसे यांना थांबवून त्यांची विचारपूस केली. त्या वेळी पाऊसच नसल्याने पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे चारापाण्याची टंचाई असून, बैलांना काय खाऊ घालू,अशी व्यथा व्यक्त करून एक लाखांची बैलजोडी पंधरा ते वीस हजारांना विकण्याची वेळ आल्याचे या शेतकऱ्याने सांगितले. या वेळी शिंदे यांनी ताफ्यातील लोहाऱ्याच्या तहसीलदारांना बोलावून या प्रकरणी आपण काय कार्यवाही केली, याबाबतचे अहवाल आपण शासनाकडे पाठवले आहेत का, याबाबत विचारणा करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत करण्याच्या सूचना दिल्या.

पाणी चाऱ्याची व्यवस्था केली तर आम्ही जगू
शेतकऱ्यांना शिवसेना कदापिही वाऱ्यावर सोडणार नाही, असा दिलासा विरोधी पक्षनेते शिंदे यांच्यासह आमदारांनी या वेळी दिला. मराठवाड्यात दुष्काळी स्थिती असून विशेष पॅकेजची मागणी शासनाकडे करणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.
पावसाअभावी सोयाबीन तूर पिकांचे झालेले खराटे, पेरणीअभावी ओसाड पडलेल्या जमिनी, चाऱ्याअभावी हाडे-कातडे एक झालेली जनावरे हे सर्व असह्यपणे सहन करणाऱ्या शेतकऱ्याची स्थिती पाहून दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आलेल्या शिवसेना आमदारांचे पथकही हेलावून गेले.

भातागळी येथील शेतकरी म्हणाले की, पिण्याचे पाणी जनावरांसाठी चाऱ्याची व्यवस्था केली तर आम्ही जगू शकतो. त्यानंतर तेथील शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून शिष्टमंडळाने कास्ती (खुर्द), कास्ती (बु.) आदी गावांना भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.