आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएममध्ये टाकण्यासाठी दिलेले ३९ लाख हडपले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र - Divya Marathi
प्रतिकात्‍म‍ि छायाचित्र
लातूर - एटीएममध्ये टाकण्यासाठी दिलेल्या रकमेतील ३९ लाख ७० हजार रुपये हडपल्याप्रकरणी शुक्रवारी चौघांविरुद्ध अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपी फरार असून दोघांना पोलिसांनी गजाआड केले आहे. फरार आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली आहेत. १ ते १४ जुलै या कालावधीत अहमदपुरातील नाथनगरातील एटीएममध्ये आरोपींनी गडबड केली आहे.
एटीएममध्ये रक्कम भरण्यासाठी बँका खासगी एजन्सी नेमतात. याअंतर्गत बँक व संबंधित एजन्सीचा करार होतो. एजन्सी त्या गाव-शहरातील शाखेकरिता नेमलेले आपले कर्मचारी बँकेकडे पाठवून रक्कम हस्तगत करते. तत्पूर्वी संबंधित कर्मचाऱ्यांना किती रक्कम द्यायची, याबाबत बँकेला मेलद्वारे कळवले जाते. असाच मेल एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनाही एजन्सी पाठवते. त्यानंतर कर्मचारी बँकेकडून रक्कम घेतात व सुचवलेल्या एटीएममध्ये टाकतात. रक्कम अदा केल्यानंतर त्यापुढील सर्व जबाबदारी एजन्सीची असते.

चेन्नई येथील एसआयएस कंपनीला स्टेट बँक आॅफ इंडियाच्या वतीने (एसबीआय) असे कंत्राट मिळाले होते. या कंपनीने अहमदपूर येथील या बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी व त्या रकमेची एटीएम यंत्रांपर्यंत वाहतूक करण्यासाठी संग्राम मोरे (वांजरवाडा), ज्ञानोबा जाधव (मेथी, ता. अहमदपूर), सतीश गायमुखे (लातूर) व माधव शिरशे (पाटोदा, ता. कंधार) यांना िनयुक्त केले होते. काही महिने काम केल्यानंतर या चौघांच्या मनात रक्कम हडपण्याचा विचार आला व ती कशी हडपावी यासाठी ते विचार करू लागले. दिलेली रक्कम प्रत्यक्ष पूर्णपणे न भरता डिजिटल यंत्रणेद्वारे ती पूर्णपणे भरल्याचे दाखवायचा फंडा यासाठी त्यांनी वापरला. डिजिटल यंत्रणेत रक्कम पूर्ण भरल्याचे नमूद करून एटीएमच्या तिजोरीत त्यांनी सर्व रक्कम भरली नाही.

१ ते १४ जुलैपर्यंत असा उद्योग ही मंडळी करत राहिली. त्यानंतर एजन्सीचे जळगाव येथील मॅनेजर बिपिनकुमार रामकुमार शर्मा यांच्या ही बाब लक्षात आली व
या प्रकरणाचे बिंग फुटले.

फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना
हे प्रकरण अाम्ही गांभीर्याने घेतले असून दोन आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपींच्या शोधात पोलिस पथके रवाना झाली असून लवकरच ते हाती लागतील.
एन. जी. केणेकर, तपासाधिकारी तथा पोलिस उपनिरीक्षक, अहमदपूर
बातम्या आणखी आहेत...