आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा हैदोस: पोलिसांच्या गस्तीनंतर अवघ्या अर्ध्यातासातच एटीएम फोडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- एटीएम मशीन फोडणाऱ्या दोन टोळ्यांनी हैदोस घालून शहरातील देवडानगर भागातील एक मशीन गॅस कटरने कापून त्यातील २० लाख ३० हजार ७०० रुपयांची रोकड पळवली. यामध्ये चोरट्यांनी २० लाख ६ हजारांचे मशीनही निकामी केले आहे. म्हणजे देवडानगरातील एटीएम पोलिस अधीक्षक कार्यालय आणि शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या मधोमध आहे.

याशिवाय कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथेही एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. विशेष म्हणजे याच भागात रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी गस्त घातली. त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासानंतर म्हणजे दीड ते अडीचच्या सुमारास चोरट्यांनी डाव साधला. त्यामुळे एटीएम फोडी पोलिसांच्या गस्तीच्या वेळेचा अभ्यास करूनच फत्ते करण्यात आली असल्याचे दिसून येत आहे.
देवडानगर भागात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम केंद्र आहे. पोलिस अधीक्षक कार्यालय आणि शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या मधोमध असलेले केंद्र या पोलिस कार्यालयांपासून २०० मीटर अंतरावर आणि २४ तास रहदारी असलेल्या नांदेड-अकोला मार्गावर आहे. गुरुवारी रात्री १ ते सकाळी ६ या
वेळेत तीन ते चार चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम मशीन कापले. त्यातील २० लाख ३० हजार ७०० रुपयांची रोकड या चोरट्यांनी लांबवली.
काम फत्ते करताना, चोरट्यांनी एटीएम मशीन पूर्णत: निकामी केले असून त्यात २० लाख ६ हजारांचे नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तपास चक्रे गतिमान केली. पोलिस उपअधीक्षक प्रसन्न मोरे, उपअधीक्षक सदाशिव जटाळे, एलसीबीचे पीआय डी. एस. थोरात, शहर ठाण्याचे पीआय जगदीश भंडरवार यांनी भेट देऊन पाहणी केली. हिंगोलीत एटीएम फोडीचे काम तमाम करत असताना त्याच वेळात कळमनुरी तालुक्यातील
आखाडा बाळापूर येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत आखाडा बाळापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीही केली आहे. मात्र, हिंगोलीतील प्रकाराबाबत पोलिसांना अद्याप काहीही ठोस पुरावा हाती लागला नाही. या प्रकरणी इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीचे अधिकारी अमित अशोक कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

शहरात चार पथके तपासावर
हिंगोली शहरातील एटीएम मशीन फोडल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके वेगवेगळ्या दिशांनी पाठवण्यात आली आहेत, तर श्वानपथक एटीएम केंद्राजवळच घुटमळल्याने चोरट्यांचा माग निघू शकला नाही. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पेमेंट अँड सर्व्हिसेसच्या तंत्रज्ञाला बोलावण्यात आले असून त्यांनी तपासणी केली आहे. लवकरच आरोपींबद्दल माहिती मिळण्यास मदत होईल. आरोपी सराईत असल्याचे दिसून येत असून ते जिल्ह्याबाहेरील असण्याचा अंदाज आहे.
- डी. एस. थोरात, पीआय, एलसीबी.