हिंगोली - अफगाणिस्तानात प्रशिक्षणासाठी जाणा-या उमरखेड व आखाडा बाळापूर येथील तरुणांना हैदराबादच्या दहशतवादविरोधी पथकाने दहा दिवसांपूर्वी अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेल्या एटीएसच्या पथकाने सोमवारी शहरातील दोन गुत्तेदारांची चौकशी केली.
इंडियन मुजाहिदीन संघटनेशी संबंधित असलेला कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील शोएब अहमद खान (२४) आणि उमरखेड येथील शाह मुदासीर (२५) या दोघांना २२ ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या एटीएस पथकाने अटक केली होती. हे दोघेही अफगाणिस्तानात दहशतवादाचे प्रशिक्षण घेण्यासाठी जात होते, अशी माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर प्रकरणाचा पुढील तपास सुरू झाला.
शोएब खान हा येथील ए. आर. खान अँड सन्स व डी. डी. जयस्वाल या दोन गुत्तेदारांकडे कामाला होता. गेल्या दीड वर्षापासून तो त्यांच्याकडे आर्थिक व्यवहाराची कामे करीत होता, तर त्याला अटक होण्यापूर्वी आठ दिवस अगोदर त्याने काम सोडले होते. हैदराबाद पोलिसांनी त्याची संपूर्ण कुंडलीच हस्तगत केल्यामुळे त्याने यापूर्वी ज्या-ज्या ठिकाणी काम केले, ज्यांच्या संपर्कात आला अशा सर्वांचीच चौकशी एटीएसकडून होत आहे.
अत्यंत गुप्तपणे तपास चालू असलेले हे पथक शनिवारी दुपारी शहरात आले होते. दोन्ही गुत्तेदारांची दुपारी चारच्या सुमारास चौकशी केली. त्यानंतर येथील स्थानिक गुन्हे शाखा आणि एटीएस सेलमधून माहिती घेतल्यानंतर आज पुन्हा गुत्तेदारांची चौकशी करण्यात आली. शोएब करीत असलेल्या कामांची माहिती या वेळी घेण्यात आली. तसेच या कामादरम्यान शोएब कोणाच्या संपर्कात आला काय, त्याने कोणासोबत आर्थिक व्यवहार केले, या दोन्ही गुत्तेदारांशिवाय कुणाकुणाच्या संपर्कात आला या अनुषंगानेही पोलिसांनी चौकशी केली आहे. येथील स्थानिक गुन्हे शाखा, आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यातूनही यासंदर्भात गुप्तता पाळण्यात येत असून मोघम उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.