आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडावर धनंजय मुंडेंच्या ताफ्यावर दगडफेक, चपला फेकल्या; मार्ग बदलून मुंडे पळाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भगवानगडावर गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या ताफ्यावर सोमवारी संतप्त जमावाने हल्ला चढवला. यामुळे समाधीचे दर्शन न घेताच मुंडे यांना डोंगरउताराच्या ओबडधोबड वाटेने निघून जावे लागले.
जमाव ‘गोपीनाथ मुंडे जिंदाबाद’च्या घोषणा देत होता. त्यानंतर जमावाने दगडफेक केली. त्यात अनेक जण जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला. गडावर तासभर हा गोंधळ सुरू होता. नंतर खासगी सुरक्षा रक्षकांनी मुंडे यांना त्यांच्या सरकारी गाडीपर्यंत नेले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

भगवानबाबा समाधी सुवर्णमहोत्सवानिमित्त गडावर हरिनाम सप्ताह सुरू असून, मंगळवारी सांगता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्रीही येणार आहेत. गडाचे महंत डॉ. नामदेवशास्त्री यांच्या निमंत्रणावरून धनंजय मुंडे सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता गडावर आले. सोबत कार्यकर्त्यांच्या दोनशे गाड्यांचा ताफा होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रवेशद्वारावरील कर्मचाऱ्यांनी यातील चार-पाच वाहनेच गडावर सोडली. भगवानबाबांच्या गादीजवळ जाऊन मुंडे यांनी दर्शन घेतले. तेव्हाच सभामंडपाच्या बाजूने मोठा जमाव धावत आला. पोलिसांनी त्यांना अडवले. परंतु त्यातील काही जण पोलिस व मुंडे यांच्या दिशेने धावत होते. मग पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. धनंजय मुंडे यांच्या विरोधात घोषणा देत जमावाने परिसर दणाणून सोडला. जमाव काबूत येत नसल्याचे पाहून पोलिसांनी मुंडे यांना महंत नामदेव शास्त्री यांच्या दालनात नेले. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे, मुंडे व महंत शास्त्री महाराजांमध्ये चर्चा झाली. गडाची सद्यस्थिती व कामांची माहिती देत असतानाच सचिव गोविंद घोळवे तेथे आले. त्यानंतर शास्त्री महाराजांनी कार्यक्रमस्थळी जाऊन जमावाला उद्देशून भाष्घ्ण सुरू केले. त्यामुळे परिसरात काहीतरी गडबड झाल्याचा गैरसमज झाल्याने काही लोकांनी शास्त्री महाराजांच्या निवासस्थानाबाहेर जमून घोषणा द्यायला सुरूवात केली. सुमारे १५ वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे विरुद्ध बबनराव ढाकणे असा संघर्ष गडावर झाला होता.

मुख्यमंत्र्यांसह पंकजा मुंडे आज येणार
भगवान गडावर प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आला. गडाला छावणीचे स्वरूप आले. मुख्यमंत्र्यांसह राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे मंगळवारी गडावर येणार आहेत. त्या काय बोलतात हे ऐकण्यासाठी गडावर ऐतिहासिक गर्दी जमण्याची शक्यता आहे. आजचा बंदोबस्तही अपुरा पडला असल्याचे मत धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी व्यक्त केले आहे.

महंत नामदेव शास्त्रींच्या निमंत्रणावरूनच गडावर
महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी एक दिवस अगोदर या असे सांगितले होते. त्यामुळे आलो. समाधीचे दर्शन झाले नाही, पण भगवानबाबांच्या गादीचे व शास्त्रींचे दर्शन झाले यात समाधान वाटते. अन्य प्रकाराबद्दल मला काही बोलायचे नाही. जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकांत नवी जबाबदारी आली तेव्हा समाधीचे दर्शन घ्यायला आलो आहे. विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आल्यामुळे आताही आलो होतो. राजकारणावर मला काही बोलायचे नाही.
-धनंजय मुंडे, विरोधीपक्षनेते, विधान परिषद.

फेकलेली चप्पल गाडीच्या बोनेटवर
समाधीचे दर्शन न घेताच मुंडे परत जाण्यासाठी गाडीजवळ येताच जमावाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. दोन गट परस्परांना भिडले. पोलिसांनी कसेबसे मुंडे यांना गाडीत बसवले. त्यांचे खासगी सुरक्षा रक्षक गाडीला लटकले. मात्र गाडी निघताच जमावाने चपला, दगड व वाळूची फेकाफेकी केली. एक चप्पल मुंडेच्या गाडीच्या बोनेटवर पडली. स्थानिक भाषेत चोरवाट म्हटल्या जाणाऱ्या नांदूर वाटेने ताफा निघून गेला. काही मिनिटांतच महाराजांच्या भाषणाचा व्हिडिओ, पळापळीचे फोटो सोशल मीडियावर झळकले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, घटनाक्रम