आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Attack On Dhananjay Munde So People Agitate At Parli

भाऊबंदकी उफाळली; परळीत बंद, नामदेवशास्त्री महाराजांच्या पुतळ्याचे दहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परळी - श्रीक्षेत्र भगवानगडावर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद परळीसह बीड जिल्ह्यात उमटले. परळीची बाजारपेठ तातडीने बंद झाली. भाऊबंदकी उफाळल्याची चर्चा परळीत होती.
घटनेचे वृत्त कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी परळीतील बाजारपेठ बंद करण्याचे आवाहन केले. व्यापाऱ्यांनीही सर्व व्यवहार तत्काळ बंद केले. सोमवारचा बाजार असल्याने भाजीपाला विक्रीची दुकाने सोडता सर्व व्यवहार बंद झाले. धनंजय मुंडे समर्थकांनी राणी लक्ष्मीबाई टॉवरजवळ जमून नामदेवशास्त्री सानप महाराज यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांनी नामदेवशास्त्री महाराजांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला; परंतु पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला. कार्यकर्त्यांनी पोलिसांना हुलकावणी देत उपजिल्हा रुग्णालयासमोरील चौकात पुतळा जाळला. समर्थक चौकाचौकांत जमून महाराजांच्या विरोधात घोषणा देत होते. राणी लक्ष्मीबाई टॉवर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी, नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, चेतन सौंदळे, जाबेर खान पठाण, शंकर कापसे, जयपाल लाहोटी, किशोर केंद्रे सहभागी होते.

आज रास्ता रोको
नामदेवशास्त्री महाराजांची भाषा चिथावणीखोर होती. धनंजय मुंडे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. इटके कॉर्नर येथे मंगळवारी सकाळी दहा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चंदुलाल बियाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली.