आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंधाऱ्याच्या बिलासाठी गुत्तेदाराचा अभियंत्याच्या घरावर हल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा धनादेश दिला नाही म्हणून येथील पाटबंधारे विभागातील लघुसिंचन जलसंधारणचे शाखा अभियंता गंगाधर मारुती कुंभार यांच्या मित्रनगर भागातील घरावर कंत्राटदारासह अन्य तीन जणांनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता घडली. रात्री पोलिसांत तक्रार देण्यास का गेलात म्हणून कंत्राटदाराने घरावर पेट्रोल बॉम्ब टाकून गोळीबार केला. या प्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

येथील कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभागातील लघुसिंचन विभगाचे शाखा अभियंता गंगाधर मारुती कुंभार मंगळवारी रात्री मित्रनगर भागातील निवासस्थानी झोपेत असताना साडेनऊ वाजता कंत्राटदार बाळू पवारसह सोनवळकर (रा.पेठबीड) व अन्य एक जीपने कुंभार यांच्या घरासमोर दाखल झाले. आमच्या सिमेट बंधाऱ्याच्या बिलाची काय सोय करता असे म्हणत बाळू पवार याने कुंभार यांना मारहाण केली. हे पाहून त्यांचा मुलगा मनीष कुंभार हा भांडणे सोडवण्यासाठी आला. त्यालाही लोखंडी पाइपने मारहाण करण्यात आली. आरडाओरड ऐकून मित्रनगर कॉलनीतील लोक बाहेर आले. त्यामुळे तिघे मारेकरी फरार झाले. त्यानंतर गंगाधर कुंभार व त्यांचा मुलगा मनीष या दोघांनी रात्री शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या प्रकाराची तक्रार दिली. तक्रार देण्यासाठी दोघे पोलिसांत गेले असल्याचे हल्लेखोरांना कळले. त्यांनी पुन्हा अन्य साथीदारांना बरोबर घेऊन कुंभार यांच्या निवासस्थानाला लक्ष्य केले. घटनास्थळी अपर पोलिस अधीक्षक माधव कारभारी, उपअधीक्षक अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक उमेश कस्तुरे यांनी भेट देऊन माहिती घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लोखंडी पाइप, गोळीबार झाल्यांनतर पडलेली काडतुसाची पुंगळी, पेट्रोल बॉम्बच्या बाटलीच्या पडलेल्या काचा आदी पुरावे जप्त केले आहेत.
हवेत दोन फायर
पती पोलिसांत तक्रार देण्यास गेल्यामुळे पत्नी सविता कुंभार घरासमोर बसल्या होत्या. तेवढ्यात कंत्राटदार बाळू पवार, सोनळकर व अन्य १२ जणांनी घरात घुसून टीव्हीसह शोकेस, खिडक्यांची तोडफोड केली. बाटलीत पेट्रोल भरून घराच्या दरवाजावर पेट्रोल बॉम्ब फेकल्याने जाळ झाला. त्यानंतर बाळू पवार याने स्वत:कडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत दोन फायर केले. या घटनेने कुंभार यांचे कुटुंब भयभीत झाले आहे. या प्रकरणी गंगाधर कुंभार व पत्नी सविता कुंभार या दोघांच्या वेगवेगळ्या दोन तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
कशामुळे झाला वाद ?
तालुक्यातील अंथरवण पिंप्री येथे लघुसिंचन विभागाकडून बारा लाख रुपयांच्या सिंमेट बंधाऱ्याचे ऑनलाइन टेंडर होते. बी. टी. वाघमारे गणेश कन्स्ट्रक्शन हे त्याला फर्म होते. जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र राऊत यांनी हे काम घेतले होते. राऊत यांच्या मेहुण्याकडून हे काम बाळू पवार याला देण्यात आले. या बंधाऱ्याच्या कामाची गुणवत्ता खराब होत असल्याने शाखा अभियंता कुंभार यांनी पवार याला नोटीस काढली होती. त्यानंतर पवार याने कुंभार यांच्या कार्यालयात जाऊन गाडीखाली चिरडण्याची धमकी त्यांना दिली होती. पावसाळ्यातच बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले. कुंभार यांनी एमबी रेकॉर्ड करून दिले होते. १२ लाख रुपयांचे बिल मंजूर झाले होते. फक्त निधीअभावी बिल प्रलंबित होते. तुम्ही मला चेक का देत नाही म्हणून बाळू पवार व त्याच्या साथीदाराने घरावर हल्ला केला, अशी माहिती शाखा अभियंता कुंभार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.