आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेलीतांडा झेडपीच्या शाळेत दोन शिक्षकांना शिवीगाळ, मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेवराई - सुटीवर का गेलात या कारणावरून गेवराई तालुक्यातील बेलीतांडा जिल्हा परिषद शाळेतील दोन शिक्षकांना मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याप्रकरणी गेवराई ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

गेवराई तालुक्यातील पाचेगाव केंद्रांतर्गत बेलीतांडा येथे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थी संख्या २१ आहे. या ठिकाणी दोन शिक्षक कार्यरत आहेत. या शाळेवरील कार्यरत शिक्षक अंकुश घनसिंग राठोड हे सोमवारी शाळेत कामकाज करत असताना त्या ठिकाणी गावातील बंडू बाबूराव राठोड व शिवाजी मोतीराम राठोड हे दोघे तेथे आले. त्यांनी अंकुश राठोड यांच्याशी वाद घालत तू सुटीवर का गेला होतास अशी विचारणा करून सकाळी दहा वाजता शाळेतच त्यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केली.याप्रकरणी जिल्हा परिषद शिक्षक अंकुश घनसिंग राठोड यांनी गेवराई पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून दोन्ही ग्रामस्थांवर शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक एस. आर. आईटवार करत आहेत.

शिक्षकांची मोठी गर्दी
एकीकडे सुटीवर गेल्याच्या कारणावरून शिक्षकांना मारहाण करण्याचे प्रकार घडत असले तरी दुसरीकडे जिल्हा परिषदेत शाळा वाऱ्यावर सोडून काही शिक्षक पुढारीपणा करत जिल्हा परिषदेत दिवसभर फिरताना दिसतात. अशा शिक्षकांवर कोण कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अहवाल मागवू
^जिप शाळा बेलीतांडा येथे शिक्षकांना नेमक्या कोणत्या कारणामुळे मारहाण करण्यात आली. यासाठी गेवराई गटशिक्षणधिकाऱ्यांना शाळेवर पाठवण्यात येणार असून त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात येईल.''
शशिकांत हिंगोणेकर, शिक्षणधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद, बीड
शिक्षक सुटीवर नव्हता
^बेलीतांडा येथे शिक्षकांना मारहाणीचा जो काही प्रकार घडला तो निंदनीय असून ग्रामस्थांनी शाळेत काय अडचणी आहेत. हे आम्हाला अगोदर येऊन सांगायला पाहिजे होते. त्या शाळेवरील शिक्षक सुटीवर नव्हता.''
ए. एस. मसरे, गटशिक्षणाधिकारी,गेवराई
बातम्या आणखी आहेत...