आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसर्‍या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा एक डाव आणि 37 धावांनी विजय

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्थ: भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तिसर्‍या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान संघाने पर्थ कसोटीत अवघ्या अडीच दिवसांत एक डाव आणि 37 धावांनी विजय मिळवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. बॉर्डर-गावसकर करंडक आता ऑस्ट्रेलियाच्या नावे झाला आहे. चौथ्या आणि मालिकेतील अखेरच्या कसोटीला 24 जानेवारीपासून अँडलेड येथे सुरुवात होईल.
भारत सलग दुसर्‍या कसोटीत डावाच्या अंतराने पराभूत झाला आहे. विदेशी भूमीवर टीम इंडियाचा हा सलग सातवा कसोटी पराभव ठरला आहे. या सातपैकी चार कसोटीत भारताचा डावाच्या अंतराने पराभव झाला. या मालिकेपूर्वी भारताने इंग्लंडकडून 4-0 ने सपाटून मार खाल्ला होता.
पहिल्या डावात अवघ्या 161 धावा काढणार्‍या भारतीय संघाला दुसर्‍या डावातही अवघ्या 171 धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा काढून 208 धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. भारताला ही 208 धावांची आघाडीसुद्धा मागे टाकता आली नाही. दुसर्‍या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक 75 धावा काढल्या. कोहलीने राहुल द्रविड (47) सोबत पाचव्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी केली. ही जोडी फुटताच भारताचा डाव पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारताच्या अखेरच्या चार विकेट 171 च्या स्कोअरवर पडल्या.
भारताकडून तिन्ही कसोटीत गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. मात्र, फलंदाजांनी गुडघे टेकल्याने संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. तिन्ही कसोटीत भारताचे दिग्गज फलंदाज अपेक्षेनुसार कामगिरी करू शकले नाहीत.
एका षटकात तीन धक्के
जेवणाच्या ब्रेकनंतर भारतीय संघ 6 बाद 165 धावा असा संघर्ष करीत होता. मात्र, पुढच्या 20 चेंडूंत भारताने उर्वरित चार विकेट गमावल्या. बिन हिल्फेनहॉस (4/54) ने 63 व्या षटकांत 3 विकेट घेतल्या. पहिल्या आणि दुसर्‍या चेंडूवर विनयकुमार आणि जहीर खान यांना बाद केल्यानंतर त्याने पाचव्या चेंडूवर ईशांत शर्माला पॅव्हेलियनमध्ये परतावले. पुढच्या षटकात सिडलने कोहलीला हॅडिनकडे झेल देण्यास भाग पाडले आणि भारताचा डाव गुंडाळला. आपल्या 20 कसोटीत खेळणार्‍या हिल्फेनहॉसने दोन्ही डावात प्रत्येकी 4 गडी बाद केले. मेलबर्न आणि सिडनेही हिल्फेनहॉस भारतासाठी कर्दनकाळ ठरला होता.
टीम इंडियावर वॉर्नर वरचढ
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने 180 धावांची खेळी केली होती. त्याला सामनावीरचा पुरस्कार मिळाला. भारतीय संघाला (161 आणि 171) दोन्ही डावापैकी एका वेळेसही वॉर्नरच्या स्कोअरला मागे टाकता आले नाही.